कळमेश्वर (Kalameshwar) : फटाक्याची वात तयार करणाऱ्या कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील कोतवाल बर्डी (ता. काटोल) शिवारात एशियन फायर वर्क्स प्रा. लि. कारखान्यात रविवारी दुपारी 1.55 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने दोन कामगारांचा भाजून जागीच मृत्यू झाला. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले. भुरा रज्जाक (वय 25) रा. भिलमा, मध्यप्रदेश व मुनिपकुमार मरावी (वय 32) रा. मंडळ घुगरी, मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहेत. सौरभ सुरेश मुसळे रा. डोरली भिंगारे, घनश्याम लोखंडे व सोहेल शेख दोघेही रा. राऊळगाव ता. काटोल, अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
कोतवाल बर्डी परिसरात बेकायदा कारखाने असल्याची चर्चा.!
या घटनेनंतर शासकीय परवाना (Govt License) नसलेले अनेक कारखाने कोतवाल बर्डी परिसरात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. आजच्या घटनेत नशीब बलवत्तर म्हणून जेवण करण्यासाठी कंपनीबाहेर गेल्याने महिला कामगार बचावल्या.
सुरक्षा व्यवस्था नाही!
एशियन फायर वर्क्स कंपनीत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. प्रत्येक क्षणी जीव धोक्यात असतो, असे कामगारांचे (Workers) म्हणणे आहे. स्फोटाचे नेमके कारण चौकशीनंतरच कळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
गेल्या वर्षी बाजारगाव येथील सोलर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सात ते आठ कामगार ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच एशियन वर्क्स कारखान्यात (Factory) झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा नाहक बळी गेला. या घटनांमुळे स्फोटक पदार्थ तयार करणाऱ्या काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन कामगार ठार, तीन गंभीर जखमी!
प्राप्त माहितीनुसार, एशियन फायर वर्क्स कंपनीमध्ये (Asian Fire Works Company) फटाक्याची वात तयार केली जाते. येथे 7 महिला कामगारांसह 31 कामगार रअसून, असून, सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत काम सुरू असते. रविवारी (ता. 16) दुपारी 1.55 च्या सुमारास एका युनिटमध्ये 7 कामगार फटाक्यांची वात तयार करीत होते. 2 कामगार जेवणासाठी घरी गेले. बाजुच्या युनिटमधील महिला कामगार कंपनीच्या आवाराबाहेर जेवण करायला गेल्या. याचदरम्यान कंपनीमध्ये भीषण स्फोट (Terrible Explosion) झाला. कंपनी बाहेर गेलेले कामगार सुदैवाने बचावले मात्र, युनिटमधील दोन कामगारांचा जळाल्याने जागीच मृत्यू झाला. तीन कामगार गंभीर जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, अनेक किमी अंतरापर्यंत हादरे बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर आजुबाजूच्या गावातील लोकांनी कंपनीच्या (Company) आवारात गर्दी केली.
माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिस (Nagpur Rural Police) अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक अनिल मस्के, कळमेश्वरचे ठाणेदार मनोज काळबांडे, सपोनि सविता वड्डे, पोउपनि मनोज टिपले, मनोज शेंडे, पोलिस स्टाफ, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी आग विझविली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तर, मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मेडिकलला येथे रवाना केले.