शासकीय कामात अडथळा करून दमदाटी करण्याचा प्रयत्न
कळमनुरी (Kalmanuri Andolan ) : तालुक्यातील मसोड शिवारातील शेतीच्या फेरफारी करीता कळमनुरी तहसिल कार्यालयात आलेल्या व्यक्तीने तुम्ही पैसे घेता मी तुमची पाहुण घेतो, अशी दमदाटी करून अर्धनग्न आंदोलन (Kalmanuri Andolan) केल्याने कळमनुरी पोलिसात दोघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील मसोड शिवार गट नं. १०९ मधील फेरफार क्र. १५३३ बाबत मसोड तलाठी सज्जाच्या अहवालावरून २१ ऑगस्टला सुनावणी होती. त्या करीता अर्जदार पवन शरदराव उन्हाळे व गैरअर्जदार भारत सातव व आनंद मनोहर उन्हाळे हे उपस्थित होते. दुपारी ३.३० च्या सुमारास गैरअर्जदार भारत सातव यांचा मुलगा नागेश भारत सातव याने तुम्ही आम्हाला तारीख वाढवून देत आहेत.
आमचा फेर रोकला आहे असे म्हणुन महिला मंडळ अधिकार्यास दमदाटी केली. याचवेळी त्याने अंगावरील शर्ट व पॅन्ट काढून अर्धनग्न होऊन महिला मंडळ अधिकार्यास तहसीलदार यांच्या न्यायालयात जाण्यापासून अटकाव करीत असल्याने महिला मंडळ अधिकार्याने त्यांच्या पतीस भ्रमणध्वनीकरून तहसील कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी त्यांच्या पतीने संबंधिताना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महिला मंडळ अधिकार्यांनी दुसर्या दरवाज्याने तहसीलदारांच्या कार्यालयात गेल्यानंतर नागेश सातव याने अर्धनग्न अवस्थेत तहसीलदार यांच्या कार्यालयात आला.
यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे हे उपस्थित होते. नागेश सातव यांच्या सोबतचा आनंद उन्हाळे याने नागेश यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करत असतांना नागेश सातव याने तुम्ही पैसे घेता, मी तुमची पाहुण घेतो, आमच्याकडे पैसे नाहीत, असे म्हणुन हा व्हिडीओ संपूर्ण प्रसारमाध्यमांवर प्रसारीत करतो अशी धमकी दिली. तसेच कळमनुरी तहसील कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून दमदाटी केल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नागेश भारत सातव, आनंद मनोहर उन्हाळे रा. मसोड या दोघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.