शहरातील विविध भागात दिली भेट, नागरिकांच्या मूलभूत सुविधांची चौकशी!
कळमनुरी (Kalmanuri) : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात नगरपालिका प्रशासनाने मूलभूत सुविधा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच रमजान ईदच्या दिवशीही ईदगाह परिसरात कोणतेही सुख सुविधा दिली नाही. शहरातही स्वच्छता न केल्याची तक्रार अल्पसंख्यांक आयोगाकडे मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन अल्पसंख्यांक आयोगाने याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी (Collector) यांना देण्यात आल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्याकडे सोपविली यानंतर कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार (Tehsildar) जीवककुमार कांबळे यांनी दि. 3 मे रोजी शहरातील ताज नगर, भाजी मंडी, नूरी मोहल्ला, इंदिरा नगर, दरगाह मोहल्ला, रजा मैदान यासह विविध भागात जाऊन मूलभूत सुविधांची पाहणी केली व नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले परंतु शहरातील अनेक ठिकाणी भेटी न दिल्याने नागरिकांनी या चौकशीवर नाराजी व्यक्त केली आहे. उपविभागीय अधिकारी आता या प्रकरणी काय अहवाल पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) या मूलभूत सुविधा तपासण्यासाठी शहरात येणार असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या (Municipal Administration) वतीने शहरातील काही भागात स्वच्छतेच्या कामाला गती दिल्याचे दिसून आले.
शहरातील स्वच्छतेच्या समस्येबाबत नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडले गाऱ्हाणे!
कळमनुरी शहरातील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी दि. 3 मे रोजी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी शहरातील विविध भागात जाऊन भेटी देत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच शहरात नगरपालिकेच्या अक्षम्य कारभारामुळे अस्वच्छतेने कळस गाठला आहे याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करीत मूलभूत प्रश्न विषयी शहरातील नागरिकांनी (Citizens) आपले गाऱ्हाणे उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडले आता याकडे उपविभागीय अधिकारी काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.