कामरगाव ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
कारंजा/वाशिम (Kamargaon Rural Hospital) : कामरगाव हे वाशिम जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर वसले असून, २० ते २५ हजार या गावाची लोकसंख्या आहे. त्यामुळे कामरगावसह परिसरातील जनतेच्या आरोग्याची सोय व्हावी. या उद्देशाने कामरगाव येथे प्रारंभी (Rural Hospital) प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु मागील काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून, या धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांसह उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांचा जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रुग्णालयात परिसरातील जवळपास ३० खेड्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. गत तीन वर्षापासून ही इमारत जीर्ण झाली, तरीही त्याच धोकादायक इमारतीत आरोग्य अधिकारी व कर्मचारी जीवाची जोखीम पत्करून आरोग्य सेवा देत आहेत. (Rural Hospital) ग्रामीण रुग्णालयात आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु शिकस्त इमारतीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाल्याने ही इमारत जीर्ण झाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रुग्णालयाच्या आकस्मिक विभागाच्या प्रवेश द्वारावरचा स्लॅब पूर्णपणे शिकस्त झाला आहे.
या रुग्णालयाच्या (Rural Hospital) इमारतीबद्दल २०२१ ला आरोग्य विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आले होते. पुन्हा १० जुलै २०२४ ला जीर्ण इमारतीबाबत पत्राद्वारे आरोग्य विभाग यांना कळविले आहे. आता नुकतेच २९ जुलैला सदर इमारत ओपीडी सेंटर व निवासस्थान वापरण्यायोग्य नाही, त्यामुळे सदर इमारत रिक्त करण्यासाठी आपल्या स्तरावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. या शिकस्त इमारतीच्या आत असलेल्या ओ.टी.मध्ये महिन्याला १० ते १२ महिलांची प्रसूती होत असल्याने होणार्या बाळाला आणि बाळंतीणच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दरवर्षी प्रशासनाकडून बिल्डिंगच्या डागडुजीसाठी लाखोचा निधी खर्च केला जातो.परंतु तो व्यर्थ ठरत आहे.त्यामुळे ही इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारावी, अशी मागणी केली जात आहे.