कनेरगाव नाका येथील घटना
कनेरगाव नाका/हिंगोली (Kanergaon Crime) : कनेरगाव नाका येथील भुसार व्यावसायिकाच्या घरामध्ये चार अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून व्यापार्याचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून कपाट फोडून नगदी ९३ हजार रूपयासह सोने, चांदी, मोबाईल असा एकूण ६ लाख ६६ हजार ५०० रूपयाची जबरी चोरी केल्याने (Basamba Police) बासंबा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कनेरगाव नाका येथील पुरूषोत्तम बाहेती हे भुसार व्यावसायिक आहेत. १ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे कुटुंबियांनी भोजन घेतल्यानंतर घरामध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचा आवाज आल्याने बाहेती यांनी उठून पाहिले असता कोणीही दिसून आले नाही; परंतु घरात आल्यानंतर घरात शिरलेल्या चार चोरट्यांनी त्यांना चाकू, गुप्तीचा धाक दाखवून आवाज न करण्याची ताकीद दिल्याने बाहेती गांगारून गेले. यावेळी (Kanergaon Crime) चोरट्यांनी त्यांना पैसे व दागदागिने कुठे आहेत, याची विचारणा करून दम दिल्याने त्यांनी पैसे कुठे ठेवले आहे ते चोरट्यांना दाखवून दिले.
यावेळी चोरट्यांनी घरातील दोन कपाट फोडून नगदी ९३ हजार रूपये तसेच २ लाख ८० हजार रूपयाचे ८ तोळ्याचे गंठण, ३५ हजाराचे १ तोळ्याची देवाच्या गळ्यातील सोन्याची चैन, १ लाख ४० हजाराचे १ तोळ्याचे हातातील सोन्याचे कडे, ५२५०० रूपयाचे १ तोळ्याचे सोन्याचे कडे, ४० हजार रूपयाचे १८ छोटे चांदीचे तांबे, २० हजार रूपयाचा चांदीचा ट्रे, ६ हजार रूपयाचा मोबाईल असा एकूण ६ लाख ६६ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल घेऊन बाहेती यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय बांधून घराला बाहेरून कडी लावून चोरटे पसार झाले. जाताना बाहेती यांचा मोबाईलही चोरट्यांनी नेला. (Kanergaon Crime) काही वेळानंतर त्यांच्या मुलीने खिडकीतून बाहेर येऊन दरवाजे उघडले. त्यानंतर या घटनेची माहिती बासंबा पोलिसांना मिळाल्या नंतर श्वान पथकासह पोलिस अधिकारी व कर्मचारी धावून आले. श्वानाने मागोवा काढण्याचा प्रयत्न केला असता पावसामुळे श्वान जागेवरच घुटमळले.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोराती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुरूषोत्तम बाहेती यांनी (Basamba Police) बासंबा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि एच. यु. भिंगारे करीत आहेत.




