कारंजा/ वाशिम (Karanja Crime) : धनज पोलीस स्टेशन (Karanja Police) हद्दीत असलेल्या दोनद शेत शिवारातील एका टीन शेडमध्ये गहू व तांदूळ साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्याने (Karanja Tehsildar) तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी पुरवठा निरीक्षक हर्षल पवार, नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी सुनील खाडे व तलाठी दत्ता ताथोड यांच्या पथकाद्वारे पोलिसांसमक्ष धाड टाकून 420 कट्टे म्हणजेच 210 क्विंटल तांदूळ जप्त केला. ज्याची अंदाजीत किंमत 8 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई 24 मे रोजी दुपारी साडे 4 वाजता करण्यात आली. या संदर्भात (Karanja Tehsildar) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षल दिलीप पवार यांच्या फिर्यादीवरून धनज पोलिसांनी 25 मे रोजी दोघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
8 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
दोनद बु. येथील गाव हद्दीतील शेत सर्वे नं. 41/1 येथे भेट दिली असता, शेत शिवारात एक टिनशेड बंद अवस्थेत आढळुन आले. शेतमालक प्रविण साहेबराव पोले यांच्या उपस्थितीत त्याचा दरवाजा उघडण्यात आला. तपासणी दरम्यान सदर टिनाच्या शेडमध्ये एकुण अंदाजे 420 धान्याचे कट्टे अंदाजे वजन 210 क्विंटल आढळुन आले. त्याची किंमत 8 लाख 50 हजार रुपये अंदाजीत आहे. सदर कट्ट्यांमध्ये गहू व तांदूळ हे धान्य असल्याचे निदर्शनास आले. तसेच एका कट्टयाचे अंदाजे वजन 70 ते 80 कीलो असल्याचे दिसुन येते.
कारंजा तहसीलदारांची मोठी कारवाई
त्याचबरोबर शेडमध्ये 1 इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 1 कॅल्क्युलेटर व 1 पावती पुस्तक आढळुन आले. शेतमालक प्रविण साहेबराव पोले याना या संदर्भात विचारणा केली असता, सदर टिनाचे शेड हे श्रीमती हेमा तुळशीराम सावंत, रा. मंगरुळपीर यांना महीना 2 हजार प्रमाणे भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. परंतु सदर भाडेकराराची कागदपत्रे मिळाले नाही, अशा आशयाच्या हर्षल पवार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण साहेबराव पोले व श्रीमती हेमा तुळशीराम सावंत यांचे विरुद्ध जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास (Karanja Police) ठाणेदार योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीतआहेत. (Karanja Tehsildar) तहसीलदारांनी एवढी मोठी कारवाई केल्याने रेशनच्या गहू व तांदुळाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या निमित्ताने कारंजा तालुक्यात पुन्हा एकदा राशनच्या धान्याचा काळाबाजार उघड झाला आहे. ता.प्र.