४३ पैकी १६ उमेदवारांची माघार
२७ उमेदवार निवडणूक रिंगणात
मानोरा (Karanja – Manora Assembly) : येत्या २० नोव्हेंबरला कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यादृष्टीने ४९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ७ उमेदवारी अर्ज नामंजूर झाले होते. त्यापैकी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला १६ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतल्याने २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.
दिवाळी उत्सव असल्याने सर्व नागरीक सण साजरा करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडडे मात्र कार्यकर्ते जोमात असुन उमेदवार गावागावात भेटीवर भर देत आहेत. आपणच इतरांपेक्षा किती लायक आहोत, हे सांगताना मतदार राजाला दिव्य स्वप्न दाखवत आहेत. नेहमीच येतो हिवाळा याप्रमाणे निवडणुका आल्या की सर्वांच्या स्वप्नात कारंजा व मानोरा तालुक्याच्या समस्या येवून त्याचा पाढा वाचल्या जातात. आकांक्षीत जिल्हयातील दोन्ही तालुक्याच्या पाण्याची समस्या, बेरोजगारी, सिंचन, विज पुरवठा, यासह शहर व गावातील अंतर्गत रस्ते, एम आय डी सी चा विकास या समस्या आ वासून उभे आहे. या विषयांना चव्हाट्यावर घेऊन निवडणूकीत आश्वासनाची खैरात वाटल्या जातात.
मात्र आता मतदार राजा सुज्ञ झाला असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा मतदारांसमोर जातांना व त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना दमछाक होत आहे. मतदार संघातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्याशी निगडीत समस्यावर बोट ठेवत आपली पोळी शेकण्यासाठी नेतेमंडळी वाऱ्यावर सोडून देतात, हा अनुभव अनेकांच्या गाठी असल्याने आता मतदार राजा देखील जागरूक व चोखंदळ झालेला आहे. मतदार राजाला आता आपल्या मताचे महत्त्व समजत असल्याने तो आता आश्वासनाकडे लक्ष न देता सावध भूमिका घेताना दिसत आहे.
३५ – कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात (Karanja – Manora Assembly) अनिल गजाधर राठोड, अशोक कनिराम जाधव, इम्रान शेरुभाई फाकिरावाले, किशोर भोजराज मानकर, गजनान यास्मिन मारुक खान, गोपाल मनोहर घोडे, जयकिसन बबन राठोड, ज्योती मंदकला अनिल गणेशपुरे, देवानंद नरसिंग पवार, निकेश सुनिल गावंडे, प्रणित देवानंद मोरे, भारत पुरुषोत्तम भगत, रामनाथ प्रल्हाद राठोड, श्याम विजय जाधव, सैय्यद नसीरुद्दिन सय्यद रहिमोद्दिन, ज्ञानेश्वर भिमराव मोडक या १६ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतला आहे.