चांदई येथील घटना
कारंजा/वाशिम (karanja Suicide) : यंदा पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीनचे पीक पिवळे पडले आणि शेतात तन वाढले. त्यामुळे उत्पन्न होणार नाही, या विवंचनेतून एका 45 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही (karanja Suicide) घटना कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चांदई येथे 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. निलेश बाजीराव खंडारे वय 45 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, ते चांदई येथील रहिवासी होते.
अती पावसामुळे पीक पिवळे पडल्याने घेतला टोकाचा निर्णय
माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृतकाचे वडील बाजीराव खंडारे यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली असून, दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. यंदा पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन पिवळे पडले आणि शेतात तन वाढल्याने उत्पन्न होणार नाही या विवंचनेतून मृतक शेतकऱ्याने आत्महत्या (karanja Suicide) केली, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहेत.