भंडार्यात विदर्भ राज्य निर्माण मेळावा ७ जून रोजी…
भंडारा (Prakash Pohare) : राज्य दिवाळखोरीत निघाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून विदर्भातील जनतेला विदर्भाचे स्वतंत्र राज्य हवे व इतर मागण्यांना घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारा भंडारा, गोंदिया व गडचिरोली पूर्व विदर्भाचा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण मेळावा दि.७ जून २०२५ रोजी भंडारा येथाील बालाजी लॉन्स येथे दुपारी १२ वाजता होणार आहे.
या विदर्भ राज्य निर्माण मेळाव्याला किसान ब्रिगेडचे (Kisan Brigade) राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांचे हस्ते उद्घाटन होणार असून या मेळाव्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणी संदर्भात तोफ गरजणार असल्याची माहिती दि. ४ जून रोजी विश्रामगृह भंडारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. अॅड. वामनराव चटप, संजय केवट यांनी दिली.
स्वतंत्र विदर्भ राज्य (Vidarbha State) निर्माण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अॅड. निरज खांदेवाले राहणार असून किसान ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी संजय केवट यांची स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याला महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे, अरुण केदार, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सुनिल चोखारे, प्रभाकर कोंडबमुनवार, राजेश काकडे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभे, तात्या मत्ते तर मेळाव्याच्या दुसर्या सत्रात अध्यक्ष म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. अॅड. वामनराव चटप तर मार्गदर्शक म्हणून मुकेश मासुरकर, विजय नवखरे, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, दादाराव फुंडे, अहमद कादर, राजेंद्रसिंह ठाकूर, अॅड. सुरेश वानखेडे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण (Vidarbha State) मेळाव्यात चार वर्ष मुंबई राज्यात राहून व ६५ वर्ष मराठी भाषिकांच्या राज्यात राहून विदर्भातील सिंचनाअभावी व कर्जापायी सुरु असलेले शेतकरी आत्महत्या, नवीन रोजगाराच्या संधी नसल्यामुळे बेरोजगारांचे स्थलांतरण व निर्माण झालेला सोशियो इॅकॉनॉमिक असा नक्षलवाद्यांचा प्रश्न, स्थलांतरामुळे कमी झालेल्या चार आमदार व एक खासदार, औष्णिक विजेमुळे होत असलेले प्रदूषण व धोक्यात आलेले आरोग्य, दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे सरकारी व वनजमिनीवर अतिक्रमण असणार्या भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व गर्भारमातांचा मृत्यू, तसेच राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती व दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल यामुळे शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी शिक्षक, तासिकेवरील शिक्षक, विनाअनुदानित शाळेतील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विदर्भातील जनता, यांची होत असलेली हेळसांड, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे, दिव्यांग लाभार्थ्यांचे व श्रावण बाळ लाभार्थ्यांचे नियमीत न मिळणारे अनुदान, आदिवासींचा नियमबाह्य कमी केलेला निधी, शेतमालाचे पडत असलेले भाव, नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्याचे न मिळालेले वापसी अनुदान, धोक्यात येत असलेली भात शेती, उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च अधिक असल्यामुळे न येणारी बचत, थकणारे कर्ज, धान शेतकरी, आत्महत्येच्या कगारवर उभा आहे. १२० वर्षांपासून सुरु असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारा केली जात आहे.
या व अन्य विषयांवर दि.७ जून रोजी आयोजित पूर्व विदर्भाचा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. अॅड. वामनराव चटप, विभागीय अध्यक्ष संजय केवट, भंडारा जिल्हा अध्यक्ष विजय नवखरे, तालुका अध्यक्ष बन्सोड आदि उपस्थित होते.
