वसमत (hingoli):- पी एम किसान सन्माननिधी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले आहेत. ही यादी पाहण्यासाठी एप्लीकेशन (application) डाउनलोड करा असा मेसेज आल्याने प्ले स्टोअर(Play Store) मधून अॅप डाऊनलोड करताच खात्यातील ७० हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार वसमत येथे घडला. ग्रामीण भागात फेक अॅपमुळे अनेक जण फसवल्या गेले असल्याचेही वृत्त आहे.
बँक खात्यातून ७० हजार रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला
वसमत येथील अनिल पातेकर यांनी अॅप डाऊनलोड करताच बँक खात्यातून ७० हजार रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे(Funding Scheme) पैसे आले आहेत. ही यादी पाहण्यासाठी पी एम किसान सन्माननिधी हा अॅप डाऊनलोड करा असे मेसेज मध्ये नमूद होते. अनिल पातेकर यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अॅप डाऊनलोड केला. अॅप डाऊन लोड झाल्यानंतर काही वेळाने त्यांना बँक खात्यातून ६९ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. पातेकर यांचा मोबाईल हॅक (Mobile Hack) करण्यात आला आहे व त्यांच्या मोबाईल मधील सर्व डाटा हॅक केला असल्याचे पातेकर यांचे म्हणणे आहे. अॅप मुळे फसवल्या गेलो असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या संदर्भात त्यांनी सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवली आहे.पी एम किसान निधी योजनेची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांना यादी पाहण्यासाठी अॅप डाऊनलोड करा अशा आशयाचे मेसेज येत आहेत यादीत आपले नाव पाहण्यासाठी शेतकरी अॅप डाऊनलोड करत आहेत अॅप डाऊनलोड करताच खात्यात असलेली सर्व रक्कम गायब होत असल्याच्या घटना घडत आहेत.
नेमके किती जणांची फसवणूक झाली हे समोर येत नाही त्यामुळेही फसवणुकीच्या घटना वाढत आहेत
विशेष म्हणजे कोणताही ओटीपी न देता फक्त अॅप डाऊनलोड केल्याने खात्यातून रक्कम गायब होत आहे कोणता अॅप खरा कोणता खोटा आहे हे कसे ओळखावे हा नवा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे सावध होण्याची गरज आहे. बँक खात्याशी (Bank account) लिंक असलेल्या मोबाईल वरून इतर कोणतेही अॅप डाऊनलोड करणे धोकादायक ठरत असल्याचे या प्रकारवरून समोर येत आहे. शेतकर्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने(Central Govt) सुरू केलेल्या योजनेवर चोरटे अशा पद्धतीने डल्ला मारून शेतकर्यांची फसवणूक करत असल्याचे हे चित्र आहे वसमत सह गिरगाव कुरुंदा परिसरातील अॅपमुळे फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे वृत्त आहे. फसवणूक झालेले शेतकरी तक्रार करत नसल्याने नेमके किती जणांची फसवणूक झाली हे समोर येत नाही त्यामुळेही फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.