न्यायालयाच्या आदेशाने बाजार समितीची कार्यवाही
परभणी/जिंतूर (Krushi bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळाने बनावट लेआउट तयार करून प्लॉट काढून अनाधिकृत गाळे तयार करून विक्री केले. दरम्यान गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बाजार समितीने तातडीने रविवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करून गाळे बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमिनोधस्त केले.
जिंतूर येथील कृउबा समितीच्या तत्कालीन प्रशासक सचिव व अभियंता यांनी २०२२ मध्ये प्रशासक मंडळावर कार्यरत असताना सर्वांनी संगनमत करून बनावट लेआऊट तयार करून प्लॉट विक्री,बागबगीचा खर्च,बांधकाम खर्च,गोदमातील भंगार विक्री,स्वच्छता व दुरुस्ती,प्रवास खर्च,जेवण इत्यादी कामात स्वतःचे हित साधण्यासाठी जवळपास ३४ लाख रुपयांचा अपहार केला होता. त्यामुळे सध्याचे बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन संचालक मंडळ,सचिव व इतर जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान बाजार समितीच्या आवारातील यलदरी व वरुड रस्त्यावर तत्कालीन प्रशासक मंडळाने व्यापारी गाळे बांधकाम करून विक्री करण्यात आले होते. त्यापैकी यलदरी रोडवरील गाळे पाडण्यात आले असून वरूड रोडवरील व्यापार्यांना २ दिवसाचा वेळ दिला आहे. ही कार्यवाही करतांना केवळ बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. बांधकाम विभागाचे कोणीही नसल्याने उलट सुलट चर्चा होत होती. ही कार्यवाही करताना व्यापार्यांना आपल्या दुकानातील सामान काढून घेण्या अगोदरच जेसीबीने बांधकाम पडण्यास सुरुवात केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सोबतच शहरातील विविध भागात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगर परिषद, तहसिल, नविन पंचायत समिती परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. याकडे सर्वच विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नियमाने कारवाई – गंगाधर बोर्डीकर
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. चुकीचा लेआउट बनवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत बांधकाम झालेले आढळून आले. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तेव्हा नागरिकांनीही कुठलाही व्यवहार करताना कागदपत्र तपासली पाहिजे, असे आवाहन सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केले आहे.