प्रति अर्ज ५० रूपयांची घोषणा हवेतच
देशोन्नती वृत्तसंकलन
गोंदिया (Ladki Bahin Yojana) : राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू केली. जिल्ह्यातील लाखो बहिणींनी यासाठी अर्ज सादर केले. या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांनादेखील सहभागी करून घेण्यात आले. या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. मात्र बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊनही, अंगणवाडी सेविकांना अजूनही एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात प्रशासनाला अर्ज, विनंतीही करण्यातआली आहे.
योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी (Anganwadi) अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून ५० रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही, अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविकांनीही अर्ज भरले आहेत. मात्र अजूनतरी त्यांच्या खात्यात पैसे आले नाही.
ऑनलाइन अर्ज भरण्यात अडथळे
अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्या (Anganwadi) सांभाळून गावागावात ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम केले. मात्र या कामामध्ये दिलेल्या मोबाइलमधील नेटचा वेग कमी असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी, अडथळे आले होते. तरीही सर्व अडथळे पार करत अर्ज भरले होते.
नियमित कामांव्यतिरिक्त इतरही कामे
अंगणवाडी सेविकांना (Anganwadi) नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. नियमित कामांव्यतिरिक्त, शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच बहुतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपक्रमांमध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येते. लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षणदेखील त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे निरक्षर व अल्पशिक्षित महिलांनी अंगणवाड्यांमध्ये जाऊन या सेविकांकडून अर्ज भरून घेतले होते.