परभणी/सेलू (Parbhani):- तुमच्या नावे कॅनरा बँकेत (Canara Bank)बोगस खाते उघडून बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसात तुमच्या नावे गुन्हा दाखल झाला असून सिबीआयकडून वॉरंट निघाले आहे असे खोटे सांगून सेलू शहरातील बँक कर्मचारी गिरिश सोमण यांच्याकडून अज्ञात इसमाने ७९ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम उकळली आहे.या प्रकरणी सोमण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूकीचा गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
सेलू शहरात दुसर्यांदा घडला प्रकार; अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेलू शहरातील शास्त्री नगरात राहत असलेल्या गिरिश दिगांबर सोमण यांच्या मोबाईल व्हॉटअॅपवर १६ ते १८ डिसेंबर दरम्यान अज्ञात इसमाने कॉल केला. तुमच्या नावाने बोगस मोबाईल क्रमांक घेण्यात आला असून कॅनरा बँकेत बचत खाते उघडले आहे. त्या खात्यातून गैरव्यवहार करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई पोलिसात तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या नावाचे सिबीआयने(CBI) वॉरंट बजावले आहे. या वॉरंटची व्हॉटसअॅपवर प्रिंट पाठवली. त्यावर रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सिबीआयचे बनावट शिक्के वापरण्यात आले होते. गिरिश सोमण यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून ७९ लाख ७६ हजार ४५ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे गिरिश सोमण यांच्या लक्षात येताच त्यांनी बुधवार १८ डिसेंबर रोजी सेलू पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात मोबाईलधारका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि.दिपक बोरसे हे करीत आहेत.