अंगणवाडी क्रमांक 4 मध्ये प्रकार
अंगणवाडीचा मनमानी कारभार समोर
जवळाबाजार/हिंगोली (ZP Anganwadi) : येथील जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक चार मध्ये लहान बालकांच्या पोषण आहारामध्ये अळ्या व किडे आढळले असल्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत एकात्मिक बाल विकास विभाग किती अनास्था बाळगून आहे हा प्रकार समोर आला आहे.
लहान मुलातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून (ZP Anganwadi) अंगणवाड्यांना धान्य पुरवठा करण्यात येतो. सदर पुरवठा करण्यात आलेले धान्य गरोदर महिला, सहा महिने ते तीन वर्षे वयोगट व तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना आहारातून वाटप करणे आवश्यक असते. अंगणवाडी मध्ये असलेल्या तीन ते पाच वर्षे वयोगटातील लहान बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी प्रथिने पुरवठा होण्यासाठी पोषण आहार तयार करण्याचे उद्दिष्ट अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. मात्र सदर धान्य शिजवून पोषण आहार तयार करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस किती दुर्लक्ष करतात हा प्रकार या माध्यमातून उघडकीस आला आहे.
शासनाने पुरवठा केलेले धान्य शिजवून बालकांना वाटप करताना ते खाण्यायोग्य आहे की नाही या प्रकाराकडे डोळेझाक करून निव्वळ पाट्या टाकण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून होत आहे हे ठळकपणे दिसून आले आहे. दरम्यान (ZP Anganwadi) अंगणवाड्यांना शासनाकडून पुरवठा होणारे धान्य नेमके किती येते व त्यातून वाटप किती होते आणि पोषण आहारासाठी नेमके धान्य लागल्यानंतर महिन्याकाठी किती उरते याचा कुठलाही ताळेबंद कोणत्याही अंगणवाडीमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे दर महिन्याला अंगणवाडीचे धान्य काळया बाजारात जात असल्याचे सुद्धा आढळून आले आहे.
जवळाबाजार येथे नऊ अंगणवाडी केंद्र (ZP Anganwadi) असून सात अंगणवाडी केंद्र स्वतःच्या इमारतीमध्ये तर दोन केंद्र किरायाच्या जागेत भरत असल्याचे दिसून आले आहे. या अंगणवाडीचा भरण्याचा वेळ अंगणवाडी सेविकांच्या इच्छेवरच असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. एकात्मिक बाल विकास विभागाने सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून व पोषण आहाराची तपासणी करून सदर दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पालक वर्गातून व्यक्त करण्यात आली आहे.