उर्वरित शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (E crop inspection) : सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम चालू असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. पण विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत ही आज बुधवार १५ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली आहे. राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या (E crop inspection) वेबसाईटवर जाऊन आपल्या पिकाची माहिती अपलोड करण्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
खरीप हंगामात शासनाकडून काही ठिकाणी डिजीटल क्रॉप सर्वे करण्यात आला होता. पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी (E crop inspection) डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. रब्बी हंगाम २०२४ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचा सामावेश आहे. तर रब्बी ज्वारी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होतो. तर १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली होती.
यावेळी शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात आली. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२५ ही मुदत आहे. मोबाईल ॲप द्वारे ई-पीक पाहणी (E crop inspection) नोंद करण्यात येणार आहे त्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्ती अनुदान यादी अपलोड साठीही आजची शेवटची मुदत
सप्टेंबर २०२४ नैसर्गिक आपत्ती अनुदान याद्या अपलोडिंग साठी १५ जानेवारी ही अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. यानंतर वेबसाईटवर याबाबतची यादी अपलोडिंग करण्याची सुविधा शासनामार्फत बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.