लातूर (latur 12th Result) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल (12th Result) ऑनलाईन पध्दतीने मंगळवार 21रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा एकूण निकाल 92.36 टक्के लागला असून राज्यातील 9 विभागीय मंडळाच्या निकालात लातूर सातव्या क्रमांकावर आला आहे. (Latur division) लातूर विभागातून 91 हजार 528 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 84 हजार 541 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 45 हजार 313 मुले उत्तीर्ण झाले आहेत तर 39 हजार 228 उत्तीर्ण मुलींचा समावेश आहे.
लातूर विभागीय मंडळाचा 92.36 टक्के निकाल
लातूर विभागीय (Latur division) परीक्षा मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार (12th Result) विज्ञान शाखेचा निकाल 97.81 टक्के लागला आहे. 50 हजार 665 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामधील 50 हजार 325 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 49 हजार 224 विद्यार्थी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले. मंडळाचा कला शाखेचा निकाल 84.10 टक्के लागला. 30 हजार 143 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 29 हजार 334 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 24 हजार 671 विद्यार्थी कला शाखेतून उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाचा वाणिज्य शाखेचा निकाल 92.31 टक्के लागला आहे. 8 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 280 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 7 हजार 644 विद्यार्थी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाले.
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी 13.29 टक्के
लातूर विभागीय (Latur division) परीक्षा मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 83.49 टक्के लागला आहे. या (12th Result) परीक्षेसाठी विभागात 3 हजार 319 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 3 हजार 151 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 2 हजार 631 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्या आयटीआयचा निकाल 84.70 टक्के लागला आहे. 440 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 438 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 371 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागीय परीक्षा मंडळातील उत्तीर्ण झालेल्या 84 हजार 541 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 169 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 13.29 टक्के आहे. 35 हजार 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 38.29 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत लातूर विभागातून 31 हजार 509 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर उत्तीर्ण श्रेणीत 5 हजार 808 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण श्रेणीमध्ये केवळ 6 टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विभागात सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा
लातूर विभागीय (Latur division) परीक्षा मंडळामध्ये लातूर, धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.39 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ धाराशिव 89.78 तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.74 टक्के लागला आहे.लातूर जिल्ह्यातील 37 हजार 459 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 36 हजार 904 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 34 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (12th Result) धाराशिव जिल्ह्यातील 16 हजार 663 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. 16 हजार 336 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 14 हजार 692 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्यातील 42 हजार 464 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 41 हजार 871 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 37 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.