उदगीर (Latur):- उदगीर परिसरात अवैध गर्भपात (Illegal abortion) होत असल्याच्या घटना घडत असल्याची चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी पाळत ठेवून येथील बनशेळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात एका पिडीत महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहात पकडून त्यास ताब्यात घेण्यात आले.
अवैध गर्भपात करताना बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडले !
याबाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.२२) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यावर बनशेळकी रोड येथील चाचा हॉटेल शेजारी असलेल्या डॉ. इरफान शमशोद्दीन मोमीन याच्या आफिया क्लिनिक या दवाखान्यात सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. आरती वाडीकर, ॲड. अनिता मेकले, शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक अंमलदार, एन.पी.सी. पुल्लेवाड, जगताप, पोलिस कॉन्स्टेबल पवार, साठे, कचवे, पद्मावती सोनवणे, रेखा राठोड यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका पिडीत महिलेच्या चार महिन्याच्या गर्भपाताची प्रक्रिया करत असताना डाॕ. मोमीन मिळून आले. यावेळी गर्भपात करणारा डॉ. इरफान शमशोद्दीन मोमीन (रा. बाबा नगर निडेबन) याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे (Medical education) प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. सदरील पिडीत महिलेस पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून रक्ताचा स्त्राव, गर्भपात गोळ्या, औषधी, इंजेक्शन(Injection), सलाईन आधी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी सदर बोगस डॉक्टर मोमीन व त्यास गर्भपातासाठी रुग्ण पुरविणाऱ्या धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल (Ayurveda Medical) रुग्णालयात काम करणाऱ्या फरजाना पठाण (रा.मुसा नगर, उदगीर) यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते करीत आहेत.