लातूर शहर मतदारसंघात लालासाहेब देशमुख यांचा वावर वाढला
– महादेव कुंभार
लातूर (Latur Assembly Constituency) : गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सत्ता केंद्रे ‘हाती’ असलेल्या बाभळगावच्या देशमुखांविरोधात आता कातपूरच्या देशमुखांनी दंड थोपटले असून या विधानसभा निवडणुकीत शहर मतदारसंघातून मैदानात उतरण्याची तयारी चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर बाजार समितीचे माजी सभापती, कातपूरचे लालासाहेब देशमुख (Lalasaheb Deshmukh) यांचा गेल्या काही दिवसांपासून (Latur Assembly Constituency) लातूर शहर मतदार संघात वावर वाढला आहे.
लातूरचे राजकारण हे काँग्रेसभोवती नव्हे, तर देशमुखांभोवती केंद्रित होते. लातूर शहर व ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे. जिल्ह्यातील औसा, निलंगा मतदारसंघात भाजपाची तर उदगीर व अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सध्या सत्ता आहे. या जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदार संघात कोणाला पाडायचे, याचा डाव लातूरमधून रचला जातो, असा आरोप बाभळगावच्या देशमुखांचे विरोधक सातत्याने करत आले आहेत. इतकेच नव्हे, तर लोकसभेलाही कोणाला पाडायचे, याचा डाव देशमुखच रचतात, असा आरोप चाकूरकरांच्या पराभवापासून लातूरमध्ये देशमुखांचे विरोधक करत आले आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ (Latur Assembly Constituency) हा माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचा मतदारसंघ आहे. काँग्रेसने अमित देशमुख यांना मराठवाड्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात लक्ष घालण्याची जाहीर सूचनाच लातूरच्या मेळाव्यातून केली आहे. तेव्हापासून आमदार अमित देशमुख हे काँग्रेसचे मराठवाड्यातील नेतृत्व आहे, अशी चर्चाही त्यांच्या समर्थकांनी चालविली आहे. एकीकडे आमदार अमित देशमुख यांना पक्षातून चांगल्या संधी असतानाच एकेकाळी त्यांच्यासोबत राहिलेले कातपूरचे लालासाहेब देशमुख यांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात लालासाहेब देशमुख निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचा गोतावळा भरपूर असल्याने गावोगाव त्यांना समर्थन मिळत आहे. मात्र भाजपा त्यांना उमेदवारी देईल का? हा लातूरकरांसमोर प्रश्न आहे.
शुक्रवारी साई येथे मारुती मंदिरामध्ये लालासाहेब देशमुख यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेत आपली भूमिका मांडली. ग्रामस्थांसोबत विकासकामांबद्दल चर्चाही केली. यावेळी ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. (Latur Assembly Constituency) योजनांबाबत काही समस्या-अडचणी आल्यास त्या तात्काळ सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही नमूद केले. याप्रसंगी प्रभाकर लिंबराज पवार, जगन्नाथ भुजंगराव पवार, रघुनाथ देविदास पवार, साहेब वामनराव पवार, विठ्ठल किसन पवार, पांडुरंग आत्माराम पवार, महेंद्र लालासाहेब पवार, आत्माराम दत्तू पवार, नितीन रघुनाथ पवार, लिंबराज गणपती पवार, दिलीप गणपती पवार, सुरेश जयराम बन, हरिश्चंद्र आडसुळकर, दत्तू सुरवसे, चाँदसाहब मणियार, श्रीरंग पवार, नानासाहेब तुकाराम पवार, नूरखा पठाण, नानासाहेब हरिश्चंद्र पवार, दत्ता बन, राजेभाऊ मनोहर पवार, विठ्ठल रामचंद्र पवार, बाळासाहेब माने, चंद्रकांत माने, धैर्यशील सुधाकर पवार, महादेव गणपती पवार, गोविंद भाऊसाहेब पाटील, हणमंत शिवाजी टेकाळे, जनार्दन शहाजी पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.