लातूर(Latur) :- भाजपाने आमची फसवणूक केली, असा आरोप करीत लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघांमध्ये विकासाचे व्हिजन नसलेले उमेदवार भाजपाने दिले अशी टीका माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
भाजपा नेत्याचा आरोप : भाजपाने आमची फसवणूक केली!
भाजपाने लातूर शहर विधानसभा मतदारसंघात (Assembly constituencies) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई चाकूरकर यांना उमेदवारी दिली तर लातूर ग्रामीणमध्ये विधान परिषदेचे विद्यमान सदस्य रमेश आप्पा कराड यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही ठिकाणी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर व त्यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र भाजपाने या दोन्ही ठिकाणी डावलल्यानंतर कव्हेकरांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
कव्हेकर म्हणाले की, लातूर शहरात नाही तर जिल्हयात भाजपा कुठेच नव्हती, तेंव्हापासन आम्ही काम करतो. परंतु भाजपाकडून नेहमीच आमची प्रतारणा कऱण्यात आली. उमेदवारी देताना किमान विकासाचे व्हिजन असलेल्या लोकांना उमेदवारी द्यायला हवी असल्याचे सांगत आपली भूमिका तटस्थ राहणार असल्याची शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आम्ही कोणाच्याही प्रचार यंत्रणेत उतरणार नाही…
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या उमेदवारीवरून संपूर्ण राज्यासह लातूर जिल्ह्यातही महविकास आघाडी आणि महायुतीत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. असाच प्रकार लातुरात दिसून येत असून लातूर शहर व ग्रामीण मतदासंघांतून देण्यात आलेल्या भाजप (BJP)उमेदवारीवर भाजपचे नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आक्षेप घेतला आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की पक्षाची भूमिका काही असली तरी ग्रामीण मतदासंघांत विधान परिषदेचे आमदार विद्यमान असताना, त्यांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना संधी देणे ही इतरांची गळचेपी आहे. त्यानंतर लातूर शहर मतदारसंघात अजित पाटील यांनी नगरसेवक, युवा मोर्चा, आघाडीच्या माध्यमातून भरपूर काम केले आहे. उमेदवारी घोषित होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाच्या नेत्यांच्या आम्हाला तयारीत राहण्याचा आदेश होता. मात्र ऐन वेळी माशी कुठे शिंकली, हेच कळलं नाही, असे सांगून कव्हेकर यांनी आम्ही कोणाच्याही प्रचार यंत्रणेत उतरणार नाही, असे सांगून भाजपाचे संघटन मंत्री विनोद तावडे आपली भेट घेणार आहेत.
त्यांनंतर आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, अजित पाटील कव्हेकर यांच्यासह समर्थक उपस्थित होते.