निटूर (Latur):- निलंगा तालुक्यात गिरकचाळ येथे मांजरा नदीवर अंदाजे 45 कोटी रुपये खर्चून अद्ययावत तंत्रज्ञानाने उभारल्या जात असलेल्या मुलासाठी निलंगा तालुक्यातील शिरोळ-वांजरवाडा शिवारातून कोट्यवधींचा मुरूम उपसा बिनदिक्कत होत असून याबाबत महसूल प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी (Collector) यात लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरोळ-वांजरवाडा शिवारात बिनदिक्कत मुरूम उपसा!
गिरकचाळ येथील या पुलाचे काम करणाऱ्या कंपनीकडून नदीपात्रात मुरूम भरणे चालू आहे. नदी इस्टिमेटला असलेल्या खदानीतून मुरूम उचलणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदार(contractor) महसूल यंत्रणेला हाताशी धरून शिरोळ शिवारातून हा मुरूम उपसा करीत आहे. पोकलेन लावून त्याच्या साह्याने हा मुरूम हायवाद्वारे उचलून नेला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरोळ शिवारातून हा मुरूम उपसा बिनदिक्कत होत असताना महसूल प्रशासन व गौण खनिज विभाग यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. हा मुरूम उपसा होत असताना या मुरमाची रॉयल्टी कोण भरणार? हा खरा प्रश्न आहे.
मुरूम उपसा होत असताना या मुरमाची रॉयल्टी कोण भरणार?
सध्या निटूर परिसरासह निलंगा तालुका गोरगरिबांच्या घरकुलांची कामे जोमात सुरू आहेत या गोरगरिबांनी एखाद-दुसरा ब्रास मुरूम किंवा वाळू आणली तर त्याची चौकशी महसूल प्रशासन व गाव गावचे तलाठी तात्काळ करून त्याला धारेवर धरतात व दंड वसूल करतात मात्र येथे पोकलेन लावून मुरूम उपसा केला जात असताना प्रशासन गप्प का? हा खराब आहे. या प्रकरणी महसूल प्रशासनाने योग्य आणि कडक कारवाई करून गौण खनिजाचा महसूल वसूल करून शासन दरबारी जमा करावा आणि सदर गुत्तेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.