लातूर (Latur):- महाराष्ट्र विकायचा आणि गुजरातला (Gujrat) द्यायचं, अशी या सरकारची नीती असून राज्यातलं हे सरकार लुटेरे, दरोडेखोर व चोरांचे सरकार असून या सरकारने राज्यावर 10 लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. असे सरकार घालवून राज्यात काँग्रेस(Congress) आणि महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन करीत प्रदेश काँग्रेसने लातूरमधून विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी शंखनाद केला.
महायुती सरकारवर हल्लाबोल करीत लातूरमधून केली सुरुवात
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात तिन्ही जागा जिंकत काँग्रेसने शंभर टक्के यश मिळवले. या यशाचा अर्थात् लातूर, नांदेड (Nanded)व जालना येथील खासदारांचा सत्कार सोहळा आणि काँग्रेसच्या लातूर, बीड(Beed)व धाराशिव या तीन जिल्ह्याच्या विभागीय मेळाव्याच्यानिमित्ताने काँग्रेसने राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शनिवारी लातूरच्या टाऊन हॉलवर फुंकले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख तर मंचावर काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले(Nana Patole), विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार(Vijay Vaddetiwar), विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. अमित देशमुख, अनिल पटेल, आमदार धीरज देशमुख, युकाँ प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, सत्कार मूर्ती लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, नांदेडचे खा. वसंतराव चव्हाण व जालन्याचे खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंचावर उपस्थित होते.
काँग्रेसने राज्यात लोकसभेच्या लढविलेल्या 17 जागांपैकी 14 जागा जिंकल्या.
काँग्रेस हा सामाजिक न्यायाची जोपासना करणारा पक्ष..?
त्यात 7 जागा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी लढविल्या व जिंकल्या, असे सांगताना काँग्रेस हा सामाजिक न्यायाची जोपासना करणारा पक्ष आहे, असे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला म्हणाले. राज्यातील काँग्रेस एकसंघ असून विधानसभेची निवडणूक सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. राज्याच्या व देशाच्या निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळ्या असतात, त्या दृष्टीने तयारी ठेवावी. काँग्रेस मराठवाड्यातील सर्वच जागा जिंकेल, याची ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये बूथवर लक्ष ठेवून आपले बूथ मजबूत करावे. ज्यांना विधानसभेला तिकीट मिळाले नाही त्यांनी पक्षाचे काम इमानेतबारे करावे. सरकार आल्यानंतर सर्वांना संधी दिली जाईल, असेही चेन्नीथाला म्हणाले.
लोकसभेत काँग्रेसने सत्तेची नव्हे तर सत्याची लढाई जिंकली
काँग्रेस सत्तेसाठी नव्हे तर न्यायासाठी लढते. कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पुरस्कार मिळाले. जे महाभारतात घडले तेच महाराष्ट्रात घडले. शकुनीने डाव टाकून पांडवांना सत्तेपासून दूर केले. त्यामुळे पुन्हा एकदा न्याय मिळविण्यासाठी महाराष्ट्रात आपणाला कृष्णनीतीने लढावे लागेल. त्यासाठीचा हा शंखनाद आज लातूरमधून झाला, असे अध्यक्षीय समारोपात माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.
फुले आंबेडकर आणि शाहू यांचा विचार या राज्यात आजपर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रुजविला. मात्र सध्याचे सरकार हे विचार मोडीत काढणारे सरकार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजा समाजात वाद लावण्याचे काम हे सरकार करीत आहे. केंद्राने आरक्षण मर्यादा 70 टक्के पर्यंत वाढविली तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. मात्र भाजपाला वाद लावूनच निवडणूक जिंकायची आहे, असा आरोप त्यांनी केला. या सभेत आमदार धीरज देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचीही भाषणे झाली. शेवटी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी आभार मानले.