लातूर (Latur):- मुख्यमंत्रीपद खुणावत असलेल्या लातूरच्या महाआघाडी नेत्याला आगामी विधानसभा निवडणुकीत(Assembly Elections) मराठवाड्याचे सेनापतीपद बहाल केले असले तरी या सेनापतीला लातूरच्या ‘गोलाई’तच रोखण्याची खेळी भाजपाने चालविली आहे. या खेळीचा पहिला डाव म्हणून ‘देव’ नाती लातूरच्या मैदानात उतरविल्या जाणार आहेत.
महाआघाडी सेनापतीला ‘गोलाई’तच रोखण्याची भाजपाची खेळी
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुखांनी भाजपावर देवघर फोडल्याचा आरोप करीत ‘देव’ मात्र आमच्यासोबत’, असे विधान केले होते. मात्र ‘देव’ सोबत असतानाही देशमुखांनी अचानकच परवा ‘अष्टविनायका’चरणी मस्तक ठेविल्याने भाजपाची खेळी ‘लय भारी’ पडत असल्याची चर्चा राजकीय धुरंधर करताना दिसत आहेत. लातूरच्या राजकारणाचे भीष्म पितामह असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांंच्या सूनबाई अर्चनाताई पाटील यांनी भाजपात (BJP)प्रवेश केल्यानंतरही लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा लिंगायत चेहरा उत्तीर्ण झाला. चाकूरकरांना लोकसभा निवडणुकीत जनतेत मिसळण्यास पुरेसा अवधी मिळाला नव्हता. लोकसभा निवडणुकीनंतर अर्चनाताई पाटील यांनी ‘काॕमन वुमन’च्या भूमिकेत लातूरच्या गल्ली-बोळांमध्ये पाऊल टाकले. लातूरकरांची लाडकी बहीण घरा-दारांपर्यंत आल्याने माय-माऊल्यांनी मायेचा हात फिरवत तिला ‘जादू की झप्पी’ दिली. चाकूरकरांच्या गेल्या अनेक निवडणुकांचे किस्सेही अनेक बुजूर्गांनी या भेटीतील संवादातून कथन केले.
‘आम्हाला उघडपणे सोबत येता येणार नाही, दबाव येतो’
इतकेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीत चाकूरकरांच्या पराभवासाठी झालेल्या यशस्वी पराकाष्टेचे कवित्वही अनेक जुन्या निष्ठावंतांनी गायिल्याची चर्चाही या भेटीतून होत असल्याचे किस्से पुढे येत आहेत. ‘तुम्हाला म्हणून सांगतो…’, या वाक्याने सुरू झालेला संवाद ‘आम्हाला उघडपणे सोबत येता येणार नाही, दबाव येतो’, यावर थांबत आहे. चाकूरकरांच्या सूनबाईंनी ‘वन टू वन मिट’ चालविल्याने काहीतरी वेगळे घडेल, असे वाटत असतानाच आता लातूरच्या मैदानात चाकूरकर कन्याही उतरलेय. परवा गरमागरम पुरीभाजीचा आस्वाद घेताना हाॕटेलसह ही ‘देव’ नातही चर्चेत आली.
गंमत म्हणजे नसते ‘उद्योग’ करुन बसलेल्या काही लोकांनी सध्यातरी दोन्ही डगरींवर हात ठेवले आहेत. त्यांच्या ‘बॕलन्स’चा अंदाज कधी काळी साक्षात् ‘देवा’लाही आला नाही. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक देशमुख आणि चाकूरकर त्यांचे अंदाज कसे बांधतात, हे लवकर कळणारच आहे. तूर्तास भावी मुख्यमत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या समर्थकांना ‘सध्या चाललंय ते बरं चाललंय…’ असा आर्जव करीत आ. अमित देशमुखांचे पाय अद्याप तरी जमिनीवरच आहेत. मात्र देवघरातील ‘देव’ आमच्यासोबत, अशी खात्री असणारे देशमुख अचानकच ‘अष्टविनायका’चरणी गेल्याने महाआघाडीच्या मराठवाड्याच्या सेनापतीला ‘गोलाई’तच रोखण्याची भाजपाची खेळी ‘लय भारी’ ठरली काय? अशी चर्चा लातूरकरांमध्ये होत आहे.