लातूर (Latur):- “वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो…” असा उदात्त हेतू ठेवून राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महावाचन उत्सव राज्यात सुरू केला. या उत्सवात सहभागी शाळांना प्रशस्तीपत्रही बहाल केले जाते. किती शाळांनी यात सहभाग घेतला, हा भाग वेगळा असला तरी सहभागी शाळांना दिल्या जाणाऱ्या प्रशस्तीपत्रावरची भाषा पाहिल्यानंतर मराठी भाषेला चढविलेली गुजराती ढब मात्र तात्काळ लक्षात येते.
महावाचन उत्सवातून मराठीचा केला इस्कोट…
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचं ‘लाडकं सरकार’ हा उपक्रम राबवतंय… गतवर्षी राबला तोच उपक्रम यावर्षीही पुढे चालू ठेवण्याचा निर्णय १६ जुलै, २०२४ रोजी निघाला. सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “महावाचन उत्सव- २०२४” हा उपक्रम राबविण्याबाबत हा निर्णय आहे. २२.११.२०२३ च्या निर्णयाचा संदर्भ यात आहे. राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये ६६,००० शाळा व ५२ लाख विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम राबविण्यास ‘रिड इंडिया सेलिब्रेशन’ने विना आर्थिक मोबदला सहकार्य केले असले तरी या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेते अमिताभ बच्चन असल्याने २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरुस्कृत योजनेंतर्गत एसआयजी १ मधील परिपत्रके १.२. ७ अन्वये Foundation literacy & Numeracy या मुख्य घटकांतर्गत NIPUN Utsav, Reading campaign & other State initiatives या उप घटकांसाठी राज्य सरकारने रु. ८७५.०० लक्ष इतका निधी उपलब्ध आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन ब्रँड अॅम्बेसेडर : प्रशस्तीपत्रावर गुजराती ढब!
मात्र एक गोष्ट छोटीशीच घडली… ‘मुंगी व्याली, शिंगी झाली… सांगा तिचे दूध किती..?’ संत एकनाथांच्या भारुडातील या प्रश्नाचे उत्तर अत्यंत चपखल आहे, ते असे ‘सतरा रांजण भरुन गेले… प्याले बारा हत्ती! आम्ही लटके ना बोलु, वर्तमान खोटे…’ या छोट्याशा गोष्टीनेच मराठी भाषेचे वर्तमान खोटे ठरविण्याचा उठाठेव केलाय. या उत्सवातील सहभागी शाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सह्यांनी दिलेले प्रशस्तीपत्र मात्र मराठी, हिंदी आहे की गुजराती ढबीचे आहे, हे कळतच नाही. ज्ञानात भर पडावी म्हणून वाचन आवश्यक असले तरी त्यामुळे मिळणारे प्रशस्तीपत्र शाळा व विद्यार्थ्यांचे ज्ञान रसातळाला नेणारे असेल, तर खरंच की हो… अशा ‘शिक्षणाच्या आयचा घो!’च म्हटलं पाह्यजे! नाही का?
वाचा प्रशस्तीपत्र…
“सरस्वती माध्यमिक विद्यालय, ठाणे, इयत्ता 10 वी, महावचन उत्सव 2024 या महावचन इयत्ता 9 वी ते 12 वी या गतातून सहभाग घेतलयाबादल अपनास हे संरक्षण पत्र प्रदान केले जात आहे। आपका वाचनच्या आवेदन और सक्रिय सहभागी हा निगम यशस्वी झाला है। वाचनाचा यात्रा आपल्याला नव्या उंचीवर नून ठेवेल यात सादि नहीं। महावचन उत्सव सहभागी नापका अभिनंदन।
आपलिया पुढिल वाचन यात्रासाथी हार्दिक शुभेच्छा! दीपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र/ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र