लातूर लोकसभा विश्लेषण
-महादेव कुंभार
लातूर (Latur LokSabha Election Results) : लोकसभा निवडणुकीची (LokSabha Election) रणधुमाळी सुरू होताच लातूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव होणार, हे ‘देशोन्नती’च्या वृत्तांकनातून स्पष्ट केले होते, ते तंतोतंत खरे ठरले. काँग्रेसचे उमेदवार डाॕ. शिवाजी काळगे विजयी झाले, याचे सारे श्रेय मतदारांनाच जाते. याचे कारण भाजपा खासदाराच्या निष्क्रियतेत दडले होते, मतदारांनी ते उघड केले. असे जरी असले तरी आ. अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांनी ही निवडणूक मनावर घेतल्याने लातूरमध्ये दहा वर्षांनंतर लोकसभेला काँग्रेस विजयी झाली.
सुधाकर शृंगारे यांनी स्वतः होऊनच निवडणूकपूर्व व निवडणुकीत टाकलेले प्रत्येक पाऊल काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी पोषक ठरत गेले. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या हातात भाजपाची दिलेली सूत्रे आणि शिवसेना व राष्ट्रवादीची केलेली फोडाफोडी, वाचाळवीरांची निर्माण केलेली टोळी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना पवित्र मानून बगलेत घेणे ही भाजपाची भूमिका लातूरच्या मतदारांना तर पटलीच नाही, शिवाय जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना व आरएसएसच्या स्वयंसेवकांनाही पटली नाही. त्यातच शृंगारे यांच्याबाबत मतदारसंघातून गेलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेक्षणातील नकारात्मक शेरे, त्यामुळेच स्थानिक नेतृत्त्वाचा शृंगारे यांना उमेदवारी देण्यास असलेला विरोध याकडे दुर्लक्ष करीत भाजपाने शृंगारे यांनाच दिलेली उमेदवारी मतदारसंघातील मतदारांना पटली नाही. पक्षाने लादलेली उमेदवारी ही भावना भाजपा कार्यकर्ता मनात ठेवून काम करत होता. त्यातच मतदारसंघाच्या प्रमुख नेत्यांवर शृंगारे यांनी ठेवलेला ‘विश्वास’ या लढाईत शृंगारे यांचा राजकीय घात करण्यास कारणीभूत ठरला. भाजपाच्या सामान्य कार्यकर्ता, पत्रकार, निवडणूक यंत्रणेत सहभागी महायुतीचा कार्यकर्ता याकडे शृंगारे यांनी आपले सेवक या भावनेतून पाहिल्याचा मोठा फटका भाजपाला बसला.
दुसरीकडे काँग्रेसने मतदारसंघात डाॕ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीपासूनच महाविकास आघाडीची मोट बांधली. माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्याकडे सर्व सूत्रे आल्याने आणि अशोक चव्हाण, बसवराज पाटील व नंतर अर्चना पाटील चाकूरकर हे अडथळे दूर झाल्याने देशमुख कुटुंबच प्रचारात सक्रीय झाल्याने मागच्या काळात गाळात रुतलेला महाविकास आघाडीचा हत्तीरुपी कार्यकर्ता उसळी मारुन बाहेर पडत प्रचाराला लागल्याने महाविकास आघाडीच्या एकीचे दर्शन मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात कारणीभूत ठरले. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊनही मतदारांनी करमणुकीपलिकडे मोदींच्या भाषणाचा विचार केला नाही. उलट उदगीरमध्ये प्रियंका गांधी यांच्या सभेतील भाषणाने मतदारांना भानावर आणण्यात हातभार लावला. हे सगळे असले तरी निवडणुकीतले महाविकास आघाडीचे मुख्य मार्गदर्शक, माजी मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुखांचे बंधू सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांचे मायक्रोप्लॕनिंग डाॕ. काळगे यांना विजयाच्या मार्गावर नेण्यासाठी मैलाचा दगड ठरला.