गोलाईचा भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करा : पालिका आयुक्तांकडे मागणी
लातूर (Latur Municipal Corporation) : अतिक्रमणाच्या नावावर महापालिकेने सोमवारी शहरातील गंजगोलाई येथील छोट्या व्यावसायिकांना हटविले. यामुळे हातावर पोट असलेल्या या छोट्या व्यवसायिकांच्या अनेक घरांमध्ये चूल पेटली नाही. त्यामुळे महापालिकेने गोलाईचा भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांनी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी महापालिकेकडे केली.
सोमवारी महापालिकेने लातूर शहरातील गंजगोलाई भागातील अनेक व्यवसायिकांची (Latur Municipal Corporation) अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून गंजगोलाई भागात अनेक छोटे व्यवसायिक, फेरीवाले, हातगाडीवाले याच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीस व महापालिका प्रशासनाने गोलाईतील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी काही व्यवसायिकांची अतिक्रमणे हटविण्यात आली. परिणामी छोट्या व्यवसायिकांची अतिक्रमणे हटविल्याने अनेक कुटुंबांची चूल पेटली नाही, अशी तक्रार करीत स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली या व्यवसायिकांनी लातूर महानगरपालिकेच्या पायऱ्यावर मंगळवारी ठिय्या दिला.
स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, शेख आयुबसाब खादरसाब, महेबूब बागवान, शेख खादर, जब्बार बागवान, तांबोळी आदींच्या नेतृत्वाखाली या व्यवसायिकांनी महापालिकेकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. हनुमान चौकापासून ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत आणि शिवाजी रोड ते मज्जिद रोड अशा भागात या व्यापार झोन निर्माण करावा, अशी मागणी यावेळी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार होत नाही; तोपर्यंत आपण या व्यावसायिकांना गोलाईतील बॅरिकेटमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
गोलाई स्थापनेपासून व्यवसाय असल्याचा दावा
अनेक वर्षांपासून गंजगोलाई भागामध्ये छोटे व्यावसायिक हातगाड्यांवर फ्रुट, सुखा मेवा, बांगडी, चप्पल, हळद कुंकू, गजरे, बेल्ट, केरसुनी, कुलूप, भाजीपाला, हार, हरमाल, पान व्यवसाय करुन आपल्या पोटाची खळगी भरतात. परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून गोलाई स्थापनेपासून हा व्यवसाय असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.