लातूर (Latur):- राज्यात राजकीय क्षेत्रातील मराठ्यांचे दहा-बारा घराणे सोडले तर मराठा समाज (Maratha society) मागासच राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी स्वतंत्र मराठा आरक्षण आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा; अन्यथा मराठ्यांची पोरं नक्षलवादी(Naxalite) होऊन या राजकारण्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
आम्हाला राजकारण करायचे नाही
कुठे निवडणूकही लढवायची नाही. मात्र मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरी बेहत्तर, अ.भा.छावा संघटनेचे सर्वच छावे त्यासाठी तयार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून समाजा समाजामध्ये वाद निर्माण होत आहेत. मराठा आरक्षणाला इतर सर्व जातींचा पाठिंबा आहे. असे असतानाही मराठा समाजाच्या विरुद्ध वातावरण तयार केले जात आहे. मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. समाजामध्ये भांडणे लावून तेढ निर्माण करीत राज्यातील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र राजकारण्यांचे आहे. शेतकऱ्यांचा कोणताच प्रश्न सोडविला जात नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी (loan waiver) करावी संपूर्ण वीज बिल माफी करावी, यासाठी आपण राज्यभर दौरे करत आहोत. मात्र मराठा आरक्षण तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यापासून लक्ष विचलित करण्याचा डाव राज्यात रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमरावभाऊ मराठे, प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी सूर्यवंशीः शहराध्यक्ष बालाजी निकम, कामगार आघाडीचे सुग्रीव जाधव, मुस्लिम आघाडीचे सुलतान सौदागर, पिंटू शिरसीकर, अरविंद गाडे आदी उपस्थित होते.
समाजाचा वापर राजकारणासाठी होऊ देणार नाही
राज्यात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. आम्हाला इतरांचे आरक्षण नको, आमच्या हक्काचे स्वतंत्र आरक्षण द्या, असे ते म्हणाले राज्यात शेण, सुपारी, दगडफेक असे प्रकार करून आरक्षण मुद्दा बाजूला ठेवून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा डाव राजकारण्यांचा आहे. मात्र छावा संघटना हा डाव म्हणून पाडेल. समाजाचा वापर राजकारणासाठी होऊ देणार नाही, असा इशाराही जावळे पाटील यांनी दिला.