लातूर (Latur) :- व्ही. एस. पँथर्सच्यावतीने यंदाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 18 मे रोजी होणार असून या विवाह सोहळ्याचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांनी केले. येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या (Blood bank) सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सहावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासंबंधी पूर्वतयारीची बैठक खटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
विवाह नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाही
विनोद खटके यांनी सांगितले की, हा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा (Mass wedding ceremony) आपल्याला मोठ्या थाटामाटात संपन्न करायचा आहे. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. या विवाह नोंदणीसाठी कुठल्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाही, अशी माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी. आपल्या संघटनेच्या मार्फत नवविवाहित जोडप्याला मनी मंगळसूत्र, वधू-वराचे कपडे, गादी-पलंग, संसार उपयोगी साहित्य इत्यादी सर्व मोफत दिले जाते. त्यासोबतच आलेल्या वऱ्हाडी मंडळांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येते. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात जाऊन या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गरजूंनी सहभागी होण्यासाठी आवाहन करावे. हा सामूहिक विवाह सोहळा 18 मे 2025 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जिल्हाभरातील गरजूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.