लातूर पोलिसांचा पहिलाच प्रयोग : 67 गुन्हे दाखल
लातूर (Latur Police) : लातूर पोलिसांनी रविवारी (दि.10) पहाटे ‘मासरेड’ राबवत गावठी दारू बनविणारे अड्डे हुडकून नष्ट केले. शिवाय अवैध देशी-विदेशी दारू व गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 7 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी रसायन नष्ट केले. या कारवाईतून 67 जणांविरुध्द 67 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी यापुढेही ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करण्यात येणार असून भविष्यात हा “ड्रोन स्ट्राईक” इतर कारवायांमध्ये ही वापरण्यात येणार आहे. ज्याद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील कोणत्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली, याचा तपशील मात्र पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात कुठेही दिलेला नाही. शिवाय ‘ड्रोन स्ट्राइक’ केला जात असताना लातूर शहर व लातूरच्या बगलेत होणारी खुलेआम दारू विक्री मात्र सताड सुरू आहे. यावर पोलिसांच्या ड्रोनचा पंखा कधी भिरभिरणार आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.