लातूर (Latur Railway) : निवडणुका तोंडावर आल्यानंतर दोन वेळा लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अनेक वर्षांचा कालावधी जावूनही लातूर रेल्वे कोच फॅक्टरीमधून अद्याप उत्पादन सुरु नाही. या फॕक्टरीतून प्रत्यक्ष रेल्वे कोच कधी उत्पादन होणार? असा सवाल करीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकारला धारेवर धरले.
लोकसभेत बोलताना खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वे विभागाकडून रेल्वे मार्गाचे बांधकाम करत असताना शेतकऱ्यांच्या वहिवाटीतील रस्ते बंद करुन रेल्वे मार्गावर युबी, ओबी अशा रस्त्यांची निर्मीती केली जाते. परंतु, हे रस्ते दर्जाहीन असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही सरकारच्या निदर्शनास आणले. लातूर- मुंबई, या गाडीस कळंब रोड (तडवळा) व नांदेड- पनवेल या गाडीस ढोकी येथे थांबा देण्यासह सोलापूर- तुळजापुर- धाराशिव रेल्वे मार्गाकरीता जमिनीचे संपादन 80 टक्के पूर्ण करुनच रेल्वे मार्गाची निविदा काढण्यात यावी. जमिनीचा मावेजा आकांक्षित जिल्हा म्हणून थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांनी लोकसभेत केली.
कोरोना महामारीमध्ये ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, पत्रकार यांसाठी असणाऱ्या रेल्वेच्या सवलती पूर्ववत सुरु कराव्यात. लातूर- मुंबई, बिदर- मुंबई रेल्वे गाडयांना अतिरिक्त जनरल डब्बे जोडावेत, या दोन्ही गाडयांमध्ये मोठया प्रमाणात प्रवाश्यांची ये जा सुरु असते त्यामुळे रेल्वे गाडयांचे जनरल डब्बे ओव्हर क्राऊड असतात. त्यामुळे धाराशिव व बार्शी स्थानकावरुन जनरल बोगीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जागा मिळत नाही. दोन्ही गाडयांना जनरल बोगीची संख्या वाढवण्यात यावी अशा मागण्या खासदार राजेनिंबाळकर यांनी यावेळी केल्या.