उदगीर(Latur):- उदगीरच्या राजकारणात खळबळ माजली असून कोणता नेता कोणत्या पक्षात प्रवेश करील.? याचा काहीच नेम उरला नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा उदगीरकरांना आला असून मागच्या निवडणुकीत संजय बनसोडे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे(Bharatiya Janata Party) उमेदवार राहिलेले डॉ.अनिल कांबळे यांनी काल शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने राजकीय वातावरण चर्चेला ऊत आला आहे. राजकारणातील चाणक्य शरद पवारांनी उदगीरच्या राजकारणात थेट एन्ट्री घेतली असून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना चोहोबाजूंनी घेरण्याची खेळी चालविली आहे.
तिसऱ्या टर्ममध्ये निवडून येण्याची क्षमता असतानाही त्यांना भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्ये तिकीट नाकारले
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सलग दोन टर्म उदगीर विधानसभा मतदारसंघाचे (Assembly constituencies) प्रतिनिधित्व केले होते. तिसऱ्या टर्ममध्ये निवडून येण्याची क्षमता असतानाही त्यांना भारतीय जनता पक्षाने २०१९ मध्ये तिकीट नाकारले होते. आणि नवख्या डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली होती. त्यात बनसोडे यांनी भाजपाच्या कांबळे यांना पराभूत केले होते. परंतु यावेळी, चित्र उलटे असून मागच्या वेळी भाजपाच्या विरोधात असलेले संजय बनसोडे यावेळी भाजपाच्या महायुतीचे उमेदवार म्हणून येणार आहेत. तर, वर्षानुवर्ष भाजपाच्या चिन्हावर लढलेले उमेदवार यावेळी भाजपाच्या विरोधात उभे राहणार आहेत. त्यात, अजूनही काही मोठे पक्षप्रवेश आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होणार असल्याची माहिती मिळत असुन उदगीर भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.
तुतारीकडून स्पर्धा वाढली..
पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोठे मासे गळाला लावले जात असुन, डॉ.अनिल कांबळे यांच्या नावाची चर्चा याचाच भाग मानण्यात येत आहे. भालेराव यांच्या पाठोपाठ डॉ. अनिल कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली तर निश्चितपणे तुतारी भक्कम होणार आहे. आगामी काळात भाजपतील अजून काही बड्या नेत्यांचे प्रवेश शरद पवारांच्या गटात होणार असल्याची माहिती मिळत असुन, अजितदादांच्या राष्ट्रवादीला बळ देण्याच्या नादात उदगीर भाजपा नेस्तनाबूत होते की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर, दुसरीकडे राजकारणातील चाणक्य शरद पवारांनी उदगीरच्या राजकारणात थेट एन्ट्री घेतली असून बनसोडे यांना चोहोबाजूंनी घेरण्यात ते यशस्वी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. अनिल कांबळे यांची व्हॉट्स ॲपवर केलेली पोस्ट मागच्या काही दिवसापासून चर्चेत…
काही महिन्यांपूर्वी डॉ.अनिल कांबळे यांच्या शेल्हाळ गावात एका कार्यक्रमात डॉ.कांबळे आणि त्यांच्या विरोधात निवडून येवून क्रीडा मंत्री झालेले संजय बनसोडे यांना एकाच मंचावर आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी, डॉ. अनिल कांबळे यांनी बनसोडे यांची स्तुती करताना बरे झाले की पडलो, मी बनसोडे यांच्या एवढा प्रचंड विकास करू शकलो नसतो असे धक्कादायक वक्तव्य केले होते. तर, काही दिवसापूर्वी उदगीर तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्हॉट्सअँप ग्रूपवर त्यांनी बनसोडे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची खरमरीत टीका केली होती. स्तुतीपासून ते जहरी टीका करण्यापर्यंतचा डॉ. कांबळे यांचा प्रवास खूप चर्चेत राहिला आहे.