लातूर (Latur) :- लोकसभेचे सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आवर्जून उल्लेख केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी चाकूरकरांनी पंतप्रधानांना लातूर भेटीचे आग्रहपूर्वक निमंत्रणही दिले.
दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर जवळपास तासभर चर्चा
याबाबत डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पत्रकारांना (Journalists) माहिती दिली. यावेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर, रुद्राली, कुशाग्र आणि ऋषिका पाटील चाकूरकर उपस्थित होते. नवी दिल्लीस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी चाकूरकरांनी नुकतीच सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने नवीन संसद भवनाची निर्मिती व व्याप्ती, लोकसभा मतदारसंघाचे होवू घातलेले परिसीमन, महिलांचा राजकारणातील सहभाग, सौर ऊर्जा मिशन, वन नेशन, वन इलेक्शन, महिला सक्षमीकरण यांचा समावेश होता. भारतातील पुरातन मंदिर स्थापत्य, शिल्प, लेण्या, अफाट निसर्ग संपदा व जैविक विविधता तसेच सांस्कृतिक व लोककलांच्या समृध्द परंपरेला जगासमोर प्रभावीपणे मांडणे व जगभर पर्यटन क्षेत्रात भारताची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी पंतप्रधानाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटली, असेही अर्चनाताई यांनी पत्रकात म्हटले आहे.