निलंगा (Nilanga):-सत्तेसाठी माजी मुख्यमंत्र्यांच्या निलंग्यात आता गृहयुध्द पेटले आहे. ‘जॕकेट, टोपी घालून कोणी डाॕ. निलंगेकरांचा राजकीय वारस होऊ शकत नाही. डाॕ. निलंगेकरांचा खरा वारस व खोटा वारस कोण? हे जनताच ठरवेल!’, असे स्पष्ट करीत कितीही पदयात्रा काढल्या त्याचा फायदा या निवडणुकीत होणार नाहीच. आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांची जनसन्मान पदयात्रा म्हणजे स्टंटबाजी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे सुपुत्र तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकरांनी केली.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची पुतण्यावर टीका!
मागील टर्ममध्येही विद्यमान आमदारांनी जनसंवाद यात्रा काढली होतीच, आता जनसन्मान (public respect) पदयात्रा काढत आहेत. काही केले तरी परिवर्तन होणारच आहे हे लोकसभा निवडणुक(Lok Sabha Elections) निकालातून सिध्द झाले आहेच. मागील वेळी कामगाराचे किट, साड्या, मिक्सर वाटले, असा आरोप करून आता निवडणुका जवळ आल्या आहेत, जनतेने सावध व्हावे, असे आवाहन अशोकरावांनी शुक्रवारी (दि.२२) येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी ते म्हणाले की, निलंगेकर साहेबांचा राजकीय वारस फक्त जनता असून कोणी जॕकेट, टोपी घालून राजकीय वारस होऊ पाहात आहेत. खरे वारस कोणीही वारस होऊ शकत नाही. मी फक्त निलंगेकर साहेबांच्या विचाराचा वारस आहे, असे सांगून विकास कामासाठी पदयात्रा काढतायत.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
अनेक गावात उद्घाटन केले आहेत, तेथे कामच सुरू केले नाही. त्याचे व्हिडिओ (Video)आमच्याकडे आहेत. देवणी तालुक्यातील विजयनगर येथे तेथील तरूण गाडीच्या आडवे पडून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवला होता, असेही ते म्हणाले. सध्या आरक्षण प्रश्न ज्वलंत असून आमचा पाठींबा आहे. जातनिहाय जणगनणा करा, अशी मागणी राहूल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. हे सरकार का करत नाही? डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची मला शिकवण आहे. त्यांना वचन दिलंय… यश, अपयश आले तरी घरात बसून राहणार नाही. आता येत्या काळात खरा वारस, खोटा वारस कोण हे जनताच ठरवेल असे अशोक पाटील निलंगेकर म्हणाले.
घाबरट सरकार…
२४ तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बहिणीवरच अत्याचार होत असले तर लाडकी बहीण योजना काढून काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला. या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सरकार आहे की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सरकार का घेत नाही? हे सरकार निवडणुकांना घाबरतंय. तीन वर्षे निवडणुका नाहीत, किती शोकांतिका आहे. राजकारणातील अनेक तरूण इच्छुक आहेत. त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.