निलंगा (Latur):- लातूर जहिराबाद महामार्गावर दररोज अपघात (Accident)होऊन मृत्यूचा महामार्ग बनलेल्या लातूर जहीराबाद महामार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने (Congress party) सुरू असलेल्या हायवे परीक्रमा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला. जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या विषयाला काँग्रेसने हात घातल्याने जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
हायवे परिक्रमा आंदोलनाला निटूरकरांचा पाठिंबा
लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याच्या अगोदरच बाभळगाव ते औराद शहाजानी दरम्यान रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडून दर दोन तीन दिवसाच्या अंतरावर अपघात होऊन मोठ्या प्रमाणात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. हायवेवरून प्रवास आणि अपघाताला निमंत्रण असेच समीकरण झाल्याने अगोदरचाच रस्ता बरा होता, किमान जीव तरी जात नव्हते, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. संबधित गुत्तेदाराकडे पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम असतानाही त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले नव्हते. हायवेवर दररोज होत असलेले अपघात आणि परिसरातील जनतेचे हाल पाहून काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने हायवे परीक्रमा आंदोलन पुकारण्यात आले.
आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आम्ही सर्व व्यापारी आंदोलनात सहभागी आहोत
या अनुषंगानेच शनिवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत निटूर व्यापारी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने मार्केट बंद ठेवून परीक्रमा आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आम्ही सर्व व्यापारी आंदोलनात सहभागी आहोत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. निटूर बाजार चौकात दोन तास रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित काँग्रेसचे नेते, व्यापारी व ग्रामस्थांनी अपघातात मृत्यू पावलेल्या व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या परिवाराच्या तीव्र भावना मांडल्या. याप्रसंगी आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंकज शेळके, अपराजित मरगणे, गिरीश पात्रे, दिलीप हुलसुरे, शकील पटेल, संजय बिराजदार, दिनकर निटुरे, अशोक हसबे, सुभाष बाबा पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, अमर निटुरे, नंदकुमार हसबे, प्रसाद बुडगे , विठ्ठल काटेवाड, राजकुमार सोनी, गौतम कांबळे, बळी मादळे, पाशा शेख, समीर पठाण दिलदार साकोळे, अमोल सूर्यवंशी, अक्षय पाटील यांच्यासह व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या बंद मधून जनतेच्या रोषाचे दर्शन : अभय साळुंके
सर्वसामान्य लोकांच्या जीविताचे रक्षण करण्याच्या पवित्र उद्देशाने काढलेली हायवे दुरुस्त करून घेण्याचे ध्येय असलेली ही परिक्रमा याला तालुक्यातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला आहे. आज निटूरचे गावकरी व व्यापारी बांधवांनी उत्स्फुर्तपणे हा बंद पुकारून तो यशस्वी करून दाखवला. हा बंद म्हणजे जनतेच्या रोषाचे दर्शन आहे. स्वत व्यापारी आणि जनता आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाला एक धार निर्माण झाली असून केवळ जनतेच्या जीवाचे रक्षण यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा पाहून लढण्यासाठी अधिक बळ आणि ऊर्जा मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतो ही लोकांमधली जागृत अवस्थाच भ्रष्टाचारांचा समूळ नाश करून समृद्ध तालुका घडवेल, अशी भावना यावेळी अभय साळुंके यांनी व्यक्त केली.