म्हणतात संध्याकाळी सहानंतर भेटा…
माध्यमिक शिक्षणाधिकारी मापारींचे मुख्याध्यापिकेने काढले माप
सीईओंकडे केली तक्रार!
लातूर (Latur university) : ‘तुम्ही दुपारी नव्हे, तर संध्याकाळी सहानंतर भेटा.. तुमची शाळा कशी राहते? ते मी बघतो!’ इतकेच नव्हे, तर ‘मी तुला आयुष्यातून उठवतो’, अशी धमकी देत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्यावर अन्याय केला. आपले वेतन थांबविले. इतकेच नव्हे, तर ‘आपण दाखल केलेली वेतन देयके स्वीकारली नाहीत, आपले गेल्या सात महिन्यांपासून वेतन बंद केले’, असा आरोप लातूरच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती देवीचंद तेलंगे यांनी केला आहे. याप्रकरणी सदरील मुख्याध्यापिकेने थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत आपली तक्रार केली असून संबंधित माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश शंकरराव मापारी यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून (Latur university( आपल्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालयात मुख्याध्यापिका असून संस्थेने व शिक्षण विभागाने आपणाला त्या पदावर अधिकृत नियुक्ती दिली आहे. आपण नियमितपणे विद्यालयाचे कामकाज चालवीत आहोत; मात्र आजतागायत आपल्या सहीने सर्व शालेय कामकाज चालू असताना व आपली वैयक्तिक मान्यता रद्द झाली नसतानाही शिक्षण विभागाने आपली वेतन देयके स्वीकारलेली नाहीत. शिवाय आपले गेल्या सात महिन्यांपासूनचे वेतन केले नाही. आर्थिक हव्यासापोटी शाळेची मान्यता काढण्याची वारंवार धमकी देण्याचे काम माध्यमिक शिक्षणाधिकारी मापारी करीत असतात, याचे कारण नेमके काय? असा सवालही त्यांनी या निवेदनात केला आहे.
माझ्यासारख्या सामान्य महिलेवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आपण माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करावी. माझे वेतन पूर्ववत चालू करावे. शिवाय आपणास जातीवाचक बोलून धमकी दिल्याबद्दल मापारी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी शिक्षण उपसंचालक जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत.
जुलै 2024 पासून आपले वेतन बंद
जुलै 2024 पासून आपले वेतन बंद आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. याचाच भाग म्हणून त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर ते जाणीवपूर्वक आपणास दुपारी भेटण्यास वेळ देत नाहीत. संध्याकाळी सहानंतर भेटण्यास सांगतात. अत्यंत जातीवाचक बोलून ‘तुमची शाळा कशी राहते, ते मी बघतो!’ ‘मी तुला आयुष्यातून उठवतो’, अशी धमकीही त्यांनी दिली, असे या मुख्याध्यापिकेने निवेदनात म्हटले आहे.