पानगाव (Latur) :- रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील ऐतिहासिक व पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या (Vitthal-Rukmini Temple)जतन व दुरुस्ती कामासाठी आमदार रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नांतून ९ कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांचा निधी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयातून मंजूर झाला असून अखेर या मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाला रविवारी (दि.२२) सुरुवात होणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
मंदिरातील देखभाल नसल्यामुळे मंदिराची पडझड झाली होती तर काही मंदिराच्या बाहेरील मूर्तीची तोडफोड
पानगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील देखभाल नसल्यामुळे मंदिराची पडझड झाली होती तर काही मंदिराच्या बाहेरील मूर्तीची तोडफोड झाली होती. २६ जून २०२२ रोजी इतिहास संकलन संस्था लातूर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पानगावच्या संयुक्त विद्यमाने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास क्षेत्रभेट व अभ्यास दौरा झाला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना पुरातत्व विभागाचे (Department of Archaeology) सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भारतातील ७३ मंदिरांच्या यादीत पानगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समावेश करण्यात आला. त्यानुसार निधीची तरतूद करण्यात आली. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून मंदिराच्या आतील व बाहेरील छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करणे सुरू आहे. मंदिराच्या आतील बाहेरील दगडावर नंबर टाकण्याचे काम चालू आहे व लवकरच मंदिरातील मूर्तीची विधिवत् पूजा करून इतर ठिकाणी हलवण्यात येणार असून यानंतर जिर्णोद्धाराच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती मंदीर समिती अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
उत्तर चालुक्यकालीन १२-१३ व्या शतकातील पानगावचे मंदीर
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर हे उत्तर चालुक्यकालीन १२-१३ व्या शतकातील असावे. या मंदिरावर होयसळ, चालुक्य आणि काकतीय यांच्या कालखंडातील स्थापत्य कलेचा प्रभाव आहे. मंदिरातील सभामंडप आणि गर्भगृह हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे दिसून येते. सभामंडपात कलात्मक स्तंभाची रचना आसून मंदिराच्या बाह्यभागात भौमितिक नक्षीकाम तसेच देवदेवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. घरांच्या गर्दीत झाकले गेलेल्या मंदिराचा फक्त मंडप बाहेरुन दिसतो. ज्याला आज लोकांनी पंढरपूरच्या धर्तीवर नामदेव पायरी आहे, असे संबोधले गेले आहे. आत शिरल्यावर मोकळ्या जागेतून आपल्याला उत्तरेकडून मूक मंडप दिसतो. तसेच पूर्व आणि पश्चिमेकडे देखील अर्ध मंडप दृष्टीस पडतात. तीन मूक मंडपामधला चौरसाकृती सभामंडप आणि चौकोनी गाभारा, असा विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आकार दिसतो. तीन मूक मंडपांना पायऱ्या सोडून जावे लागते. वामन भिंतीवर उतरत्या आकाराचे बसण्याचे कट्टे आहेत.
अंतराळालाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूनी दोन विष्णूच्या स्थानकमूर्ती
त्या कट्ट्याच्या बाहेरील बाजूस विविध थरामध्ये सुंदर आणि कोरीव नक्षीदार काम आहे. कणी कुंभ थराबरोबरच गज आणि रत्नथरांची पट्टी सर्वत्र कोरलेली दिसते. तीन मूकमंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतीवर शंकरपाळ्यासारख्या आकाराची आरपार नक्षी केलेली व आत हवा येण्यासाठी खिडक्या कोरलेल्या आहेत. सभामंडपात दोन भिंतीवर एका कोण्यात गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या कोण्यात एका नवीन देवाची मूर्ती बसवलेली आहे. अंतराळालाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूनी दोन विष्णूच्या स्थानकमूर्ती बसवल्या आहेत. मंदिराच्या सर्व व्दारशाखा पंचशाखा आहेत. अंतराळाच्या व्दारशाखेवर ललाटबिंबावर गणपती आणि त्यावरील अंतरंगावर विष्णू आणि आसनस्थ नृसिंहाच्या छोट्या प्रतिमा आहेत. गर्भगृहात उत्तर मध्ययुगात बसवलेली विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती पहायला मिळते. येणारे वारकरी पायावर डोकं ठेऊन दर्शन घेताना पंढरपुरच्या विठ्ठलाची आठवण येते.
यावर बांधलेले शिखर हे विजोड आहे. अशा या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व्हावे, म्हणून आमदार रमेशअप्पा कराड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यशासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने राज्यातील ७३ ऐतिहासिक व पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या मंदिराचा चहूबाजूंनी कायापालट झालेला दिसणार आहे.