देवणी (Latur):- एसएमएस मिळाल्यावर शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीनचे (soybeans) चार-चार दिवस वजन केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दरदिवशी गाडी भाड्याचा अतिरिक्त भूर्दंड नाहक सोसावा लागत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुरक्षेसाठी इथे सुरक्षारक्षक नाहीत, गोडाऊन परिसरास कुंपण व सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) नसल्याने शेतकऱ्यांना उन्हात, थंडीत २४ तास उघड्यावर मातीत किवा वाहनातच बसावे लागत आहे.
कोनाळीच्या शेतकऱ्यांची तक्रार; शेतकऱ्यांच्या माथी वाहन खर्चाचा भूर्दंड!
देवणी येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्रावर मूलभूत सुविधांचा अभाव असून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी कोनाळी येथील शेतकऱ्यांनी देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येणाऱ्या सोयाबीनची हाताळणी करण्यासाठी मनुष्यबळ, वजन काटे नाहीत. जागा अपुरी असून या केंद्रावर पिण्याचे पाणीही या केंद्रावर नाही. सदरील संस्था शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करीत असल्याचा दाट संशय असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. सुरुवातीपासून या संस्थेद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठीही जुजबी कारणे सांगून प्रचंड टाळाटाळ केली.
संस्थेद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यासाठीही जुजबी कारणे सांगून प्रचंड टाळाटाळ
आता खरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. यात सुधारणा करण्यात याव्यात, संस्थेकडे सोयाबीन खरेदीसाठी लागणाऱ्या मुलभूत सोयी सुविधा नसताना कसलीही शहानिशा न करता शासनाने/नाफेडद्वारे परवाना दिलाच कसा? याचीही चौकशी करण्यात यावी. सोयाबीन चाळणी आणि हाताळणीसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात आहेत. हे शासकीय नियमानुसार असेल तर मागणी करूनही घेतलेल्या पैशांची रीतसर पावती संबंधित संस्था का देत नाही? याचीही चौकशी व्हावी. जर शासकीय नियमानुसार नसेल तर हे पैसे घेणे तात्काळ थांबवून यापूर्वी घेतलेले सर्व पैसे शेतकऱ्यांना परत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर शेतकरी राजेश्वर कोनाळीकर, नामदेव पाटील, पद्माकर पाटील, राम बिरादार, राजकुमार बिरादार, बाबुराव माळी, प्रताप पोलकर, ग्यानोबा माने, वैभव बिरादार, दत्तात्रय भोळे, गोवर्धन पाटील, जयश्री कोनाळीकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.
परवाना विनाविलंब रद्द करावा
सदरील संस्थेची शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीबाबत असलेली प्रचंड अनास्था आणि अकार्यक्षमता पाहून यांचा परवाना विनाविलंब रद्द करावा आणि दुसऱ्या सक्षम संस्थेची नेमणूक यापुढील तुर आणि हरभरा खरेदीसाठी करावी. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा देवणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, सहकार मंत्री, कृषीमंत्री यांनाही हे निवेदन दिले आहे.