उदगीर (Latur):- १९९९ साली उदगीर तालुक्याचे विभाजन करुन देवणी आणि जळकोट या दोन नव्या तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी, नांदेड जिल्ह्यातील तब्बल १७ गावांना जळकोट तालुक्याला जोडण्याचे निश्चित झाले असतानाही त्या गावांनी विरोध केल्यामुळे त्यांनी ‘स्टे’ (Stay) मिळविण्यात यश प्राप्त केले होते. आता, उदगीर जिल्हा निर्मितीवरुन पुन्हा एकदा ‘तो’ कळीचा मुद्दा चर्चेत असून यावेळी ‘त्या’ १७ गावांना संभाव्य उदगीर जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘त्या’ १७ गावांना संभाव्य उदगीर जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न होणार का ?
सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील कंधार व मुखेड तालुक्यातील १७ गावांनी २५ वर्षापूर्वी जळकोट तालुक्यात समविष्ट व्हायला विरोध केला होता. त्यावेळी, जळकोट तालुक्याच्या नावावरून बराच संघर्ष झाल्याचे चित्र दिसून आले होते. आता पुन्हा एकदा तोच मुद्दा, संभाव्य उदगीर जिल्हा निर्मितीवरून चर्चेत आला आहे. त्यावेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत असा काहीसा मुड ‘त्या’ १७ गावातील बहुतांश नागरिकांचा झाला असून उदगीर जिल्ह्यात येण्यासाठी जनता सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.