औसा (Latur):- लोकसभा निवडणुकीत दगाफटका झाला, पराभव झाला. याला अधिक जिव्हारी घेऊ नका. पराभव व विजयाचे पर्व असते. आ.अभिमन्यू पवार पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होवून गेले पाहिजेत. यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांना मतपेटीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आतापासूनच घ्यावी, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री(Union Minister of State) रावसाहेब दानवे यांनी केले.
रावसाहेब दानवे यांचे औशात आवाहन; विधानसभा भाजपा अधिवेशन
औसा विधानसभा भाजपा (BJP)अधिवेशनात दानवे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, गोविंद केंद्रे, सुशीलकुमार बाजपाई, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, कासारशिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, किरण उटगे, सभापती चंद्रशेखर सोनवणे, संगायो समितीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब मोरे, रोहयो समितीचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड, कल्पना डांगे उपस्थित होते. याप्रसंगी दानवे पुढे म्हणाले, सरकारने विकास योजनेचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळावे व योजनांची माहिती लोकांना द्यावी. याप्रसंगी काही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच काही नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दानवे यांच्या हस्ते देण्यात आले.
आ. पवार यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.