जैविक शौचालयाची प्रतिकृती अडगळीला धूळखात!
लातूर (Latur Zilla Parishad) : संपूर्ण स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून किमान शासकीय कार्यालय, (Latur Zilla Parishad) शाळा महाविद्यालयात जैविक शौचालय उभारली जावीत यासाठी लाखों रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या जैविक शौचालयाच्या प्रतिकृती अडगळीत पडून राहिल्या आहेत, त्यामुळे हा उपक्रम कशासाठी निर्माण करण्यात आला आणि तो बारगळला का अशी चर्चा केली जात आहे.
शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था यासह गर्दीच्या ठिकाणे स्वच्छ रहावीत यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शासनाच्या निधीतील लाखों रुपये खर्च करून जैविक शौचालयाची प्रतिकृती तयार करण्यात आली आणि सदरची प्रतिकृती पाहून शहर, तालुका स्तरावर स्थित शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था यांनी बोध घ्यावा यासाठी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आले.
सलग पाच वर्षांपासून एकाच जागेवर ठेवलेल्या प्रतिकृती आज जीर्ण अवस्थेत शोभेची वास्तू बनल्या आहेत तसेच स्वच्छतेचा डंका देणाऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालय किंवा शैक्षणिक संस्थेनेला याचा आदर्श घ्यावा वाटला नाही हे नवल आहे. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकांच्या कल्याण किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून घेतलेला एखादा निर्णय त्यानंतरच्या अधिकाऱ्यांनी अंमलात आणला तर त्यासाठी खर्च झालेला निधी हा कामी लागतो. अन्यथा अशा प्रकारे तो खर्च वाया जातो अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.