लातूर (Latur) : नवी दिल्ली येथे गेल्या 42 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण करीत असलेले सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांची आज शेतकरी संघटनेचे नेते (Leaders of Farmers Union) तथा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, लातूर युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, घनसावंगी तालुकाध्यक्ष विश्वंभर भानुसे यांनी भेट घेतली.
पंजाब-हरियाणा बॉर्डर (खनौरी बॉर्डर) येथे शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन दिल्लीकडे (Delhi) जात असताना, पोलिस (Police) बळाचा वापर करुन त्यांना तेथेच अडवून ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याला एक गोळी लागून त्याचा जीव गेला. सुमारे दहा हजार शेतकरी पंजाब -हरियाणा बॉर्डर वर अत्यंत कडाक्याच्या थंडीत बसले आहेत. तर सरदार जगजितसिंग डल्लेवाल हे गेल्या 42 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांची तब्येत अत्यंत खराब आहे. तरीही सरकार (Govt) त्यांच्याशी बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी साधी चर्चा करायलाही तयार नाहीत. ते शेतकरी काय या देशाचे नागरीक नाहीत, माणूस नाहीत? असा सवाल या शेतकरी नेत्यांनी केला. अशा पद्धतीने शेतकरी आंदोलनाची (Movement) अवहेलना करणाऱ्या केंद्र सरकारचा या शेतकरी नेत्यांनी जाहीर निषेध नोंदविला.