उदगीर (Latur):- प्रवासी नेत्यांनी, उदगीरचे राजकीय वातावरण विचित्र वळणावर नेवून ठेवले आहे. भल्याभल्या नेत्यांना त्यांनी स्वतःच्या खिशात ठेवल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी ज्यांचे नावही कुणाला माहीत नव्हते, अशांनी भारतीय जनता पार्टीचे (BJP)मालकत्व घेतले आहे. कुणीही यावे आणि टिकली मारून जावे अशी गत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची झाली असल्याने, पैसा बोलता है .! असा मतप्रवाह बनला आहे.
..त्या सगळ्या निष्ठावंतांना काही हुजऱ्यांनी ‘फ्रेम’मधून केले बाजूला
ज्यांनी रक्ताचे पाणी करुन उदगीर मतदारसंघात कमळ फुलविले होते, त्या सगळ्या निष्ठावंतांना काही हुजऱ्यांनी ‘फ्रेम’मधून बाजूला केले आहे. जावू तिथं खाऊ, म्हणत पक्षनिष्ठा विविध उपऱ्यांकडे गहाण ठेवली असून मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या भारतीय जनता पार्टीवर अवकळा पसरली आहे. दरम्यान, शंभर वाहनाचा ताफा घेवून गेलेल्या कार्यकर्त्यांची मुंबई’वारी’ विविध कारणांनी चर्चेत आहे. पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या, स्थानिकच्या ‘दोन’ निष्ठावंत चेहऱ्यांना इच्छुक उमेदवार म्हणून प्रस्तुत केले असले तरी, समोर आलेले चित्र बरेच काही सांगून जात आहे. चार महिन्यांतच, पक्षाचे मालक असल्याची भावना प्रवासी नेत्यांमध्ये तयार झाली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक मतदारांत नैराश्य पसरले आहे.
येत्या दोन दिवसात, राजकीय धक्का..
महायुती असो की, महाविकास आघाडी असो.! सगळीकडे संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीत भारतीय जनता पार्टीची भूमिका संशयास्पद असून महाविकास आघाडीत काँग्रेसवर सर्वांची नजर आहे. यात, विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची राजकीय भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर, आगामी दोन दिवसात उदगीरच्या राजकारणात मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाच्या नेत्यांनी, मतदारांना गृहित धरू नये.!
उदगीर मतदारसंघ जर का, भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे तर मग उमेदवार म्हणून पैसेवाला कशाला हवा.? चळवळीत वाढलेल्या एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला पक्षाने तिकिट दिले तर निदान निष्ठावंताची कदर होईल.! अन्यथा, निष्ठावंत कार्यकर्ते आणि पारंपारिक मतदार यावेळी तथाकथित उपऱ्यांना अस्मान दाखवतील हे मात्र नक्की.!