परभणी (Parbhani):- महावितरणचा कारभार या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. उघडे रोहित्र, लोंबकळणार्या तारा, जीर्ण झालेले विद्युत खांब (electric pole) यामुळे वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता रोहित्र असलेले विद्युत खांब देखील एका बाजुला झुकल्याने महावितरणचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. परभणी शहरातील सुभेदार कॉलनी भागात मेमन इमारती जवळ असलेले विद्युत रोहित्र धोकादायक पध्दतीने मागील बाजूला झुकले आहे. या विद्युत रोहित्रावरुन परिसरात वीज पुरवठा (power supply) केला जातो. रोहित्राच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष
शहरात विजेची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. झुकलेले विद्युत रोहित्र, खुले विद्युत रोहित्र तसेच जीर्ण झालेले विद्युत खांब, नादुरुस्त रोहित्र यांच्या दुरुस्तीकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. महावितरणने याकडे लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
परभणी शहरातील विद्युत खांबावरुन केबल नेटवर्क, खाजगी इंटरनेट यांच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्या लोंबकळल्या असून तुटून पडल्या आहेत. या तारांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत खांबावर तारांचे बंडल सर्रासपणे लावल्या जात आहेत. विना परवानगी या तारा विद्युत खांबावरुन टाकण्यात येत आहेत.