मानोरा(Washim):- तालुक्यातील कुपटा मंडळ अंतर्गत येत असलेल्या साझामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत विट भट्टीवर कार्यवाही करण्यासंदर्भात १० महिन्यापूर्वी तक्रार निवेदन देवूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता येत्या २५ जानेवारी पर्यंत कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्याच्या इशाऱ्याचे तक्रार निवेदन जिल्हाधिकारी बुवनेशरी एस यांना प्रकाश बळीराम राठोड यांनी दिले आहे.
२५ जानेवारी पर्यंत कार्यवाहीची मागणी
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कुपटा मंडळ अंतर्गत येत असलेल्या साझा मध्ये अनेक अनधिकृत विट भट्ट्या सुरू आहेत. या अनधिकृत सुरू असलेल्या विट भट्ट्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात दहा महिन्यापूर्वी तक्रार निवेदन देवून महसूल विभागाकडे (Department of Revenue) कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परंतु तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे अनधिकृत सुरू असलेल्या विटभट्टीधारक व विट भट्टिवर आर्थिक मधूर संबंधातून कार्यवाही करण्यास धजावत नाहीत. यामुळे महसूल विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशासन चालविण्यात कर्तव्यात कसूर होत आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याबाबत संबंधितांची चौकशी होऊन दोषीवर कार्यवाही व्हावी.
येत्या ७ दिवसात दिलेल्या तक्रारीची चौकशी करून कुपटा मंडळातील विट भट्ट्याचे तक्रार धारकासमोर स्थळ निरीक्षण करण्यात यावे, अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार धारकांने दिला आहे. तक्रारीच्या प्रतीलिपी मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई, लोकायुक्त मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त यांच्यासह इतरांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.