पथकाला कृषी केंद्रांतील प्रत्यक्ष युरिया साठा आणि मशीनवरील नोंदीमध्ये तफावत आढळून आल्याने कारवाई…
भंडारा (Krushi Seva kendra) : जिल्हा भरारी पथकाच्या अचानक तपासणी दरम्यान साठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे (Krushi Seva kendra) खत परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या गुणवत्ता निरीक्षकांनी व्यापक तपासणी केली असून, त्यांनी १३७ किरकोळ विक्रेते व १३ घाऊक विक्रेत्यांची तपासणी पूर्ण केली. भंडारा जिल्हयाच्या तालुका पातळीवरही गुणवत्ता निरीक्षकांकडून ३१ कृषी केंद्रांना (Krushi Seva kendra) नोटीस बजावण्यात आली असून खुलाशानंतर त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योग्य शासकीय निकष पाळणे ही विक्रेत्यांची जबाबदारी असून, साठा अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.
कारवाई झालेली कृषी केंद्रांची परवाने निलंबित कालावधी
जय भारत कृषी केंद्र, गणेशपूर–१५ दिवस, आर.एम.कृषी केंद्र, नवरगाव–३० दिवस, परमात्मा एक कृषी केंद्र, मोहदुरा–१० दिवस, पवन कृषी केंद्र, खापा–१५ दिवस यांचा समावेश आहे.
खताची विक्री केल्यानंतर नियमानुसार पॉस मशीनमध्ये माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. ही माहिती अपडेट न झाल्यास संबंधित विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणावर खताचा साठा दिसून येतो. केंद्र सरकारकडून देखील खत असल्यानंतरही संबंधित जिल्ह्यातून मागणी कशी आली, याबाबत विचारणा होते. त्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली.
-किशोर पात्रीकर, प्रभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा




