जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा
खमारी (बुटी) (Amgaon murder case) : जुन्या भांडणाचा वचपा काढत धारदार शस्त्राने सम्मेश मेश्राम याची निघृण हत्या केल्याप्रकरणी आरोपींवर दोष सिध्द झाल्याने दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.जी.अस्मत यांनी आरोपी सचिन उके (२९), रोहन ऊर्फ गौरव उके (२४) व मयुर नंदागवळी (२९) तिन्ही रा. आमगाव (दिघोरी) यांचेविरूध्द आजन्म कारावास व प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
भंडारा तालुक्यातील आमगाव (दिघोरी) (Amgaon murder case) येथील मृतक सम्मेश मेश्राम हा दि. १७ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान कवलेवाडा जाणार्या रस्त्याने जात असताना आरोपी सचिन उके, रोहन ऊर्फ गौरव उके व साथीदार मयुर नंदागवळी यांनी त्याचेशी जुन्या भांडणावरून त्याचा वचपा काढण्याच्या दृष्टीने सुरा, गुप्ती, कटर व लोखंडी नळाच्या पाईपच्या सहाय्याने अत्यंत क्रुरतेने सम्मेश याचेवर शरीराच्या सर्वच भागावर सपासप वार करून जागेवरच मुडदा पाडला. घटनेनंतर तिघेही आरोपी फरार झाले. घटनेची तक्रार कारधा पोलिसात करण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिसांनी शोधपथक तयार केले.
तत्कालीन सपोनि ऋषीकेश चाबुसवार व पोशि वाघ यांनी मोठ्या शिताफिने आरोपींचा शोध घेऊन छत्तीसगडमधील रायपूर येथून तिघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तत्कालीन ठाणेदार राजेश थोरात यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत मिसाळे यांनी घटनेचा तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र जिल्हा सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश आर.जी.अस्मत यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्पेâ सहाय्यक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी गांभिर्याने बाजू मांडून आरोपीविरूध्द साक्षपुरावे देण्यात आले.
न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद एैकूण परिस्थितीजन्य पुरावे, न्यायवैद्यकीय पुरावे व इतर साक्ष पुराव्यांची पडताळणी करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.जी. अस्मत यांनी सम्मेश मेश्राम याची हत्या केल्याप्रकरणी सचिन उके, रोहन ऊर्फ गौरव उके व मयूर नंदागवळी तिन्ही रा. आमगाव/दिघोरी यांचेविरूध्द दोष सिध्द झाल्याने कलम ३०२ भादंविमध्ये आजन्म कारावास (Amgaon murder case) व प्रत्येकी २० हजार रुपये आर्थिक दंड असा एकूण ६० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर याच घटनेतील इतर पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
सदर प्रकरणात (Amgaon murder case) जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी, कारधाचे ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोहवा सुकरू वलके यांनी कोर्ट पैरवी केली.