हिंगोली (Hingoli Life Insurance) : भारतीय विद्यामंदीर शाळेतील शिक्षिकेने आयडीबीआय बँकेतून २७ लाखाचे गृहकर्ज मंजूर करून घेतले होते. त्यासाठी विमा पॉलिसी बंधनकारक असल्याने त्यांनी हिंगोली भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेत विमा काढला होता. या दरम्यान शिक्षिकेचा १० मे २०२१ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे बँक व विमा कंपनीकडे पॉलिसीच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. हे प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात गेले असता २२ जुलैला (Indian Life Insurance Company) भारतीय जीवन विमा कंपनीला पॉलिसीचे ३० लाख रूपये व ९ टक्के व्याज, नुकसान भरपाई ५० हजार व खर्च ५ हजार रूपये देण्याचे आदेशित केले.
भारतीय विद्यामंदीर मंगळवारा शाळेतील शिक्षिका वर्षा कैलास नाईक यांनी आयडीबीआय बँकेकडे ३० लाख रूपये गृहकर्जाची मागणी केली असता बँकेने २७ लाख रूपये मंजूर केले होते. त्यासाठी त्यांना ३० लाखाची विमा पॉलिसी काढणे बंधनकारक केले होते. पॉलिसीसाठी वर्षा नाईक यांनी पती कैलास नाईक यांना नॉमिनी केले होते. ही पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा हिंगोलीकडून काढली होती. त्याचा एक रकमी प्रिमीयम ठेवल्याने वर्षा नाईक यांच्या बचत खात्यातून कपात केले होते. (Life Insurance) पॉलिसी घेतल्यानंतर वर्षा नाईक यांचा १० मे २०२१ रोजी जालना रूग्णालयात कोव्हिड-१९ कार्डियाकमध्ये मृत्यू झाला.
त्यामुळे पती कैलास नाईक यांना गृह कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाल्याने त्यांनी वर्षा नाईक यांचा विमा काढलेला असल्याने त्यांनी गैरअर्जदार बँक व विमा कंपनीकडे पॉलिसीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता; परंतु (Life Insurance) विमा कंपनीने नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचे पत्र ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले होते. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. हे प्रकरण ७ मार्च २०२२ रोजी दाखल करण्यात आले होते. सखोल चौकशी अंती आयोगाने २२ जुलैला अंतीम आदेश पारीत करून तक्रारदारास पॉलिसीचे ३० लाख रूपये द्यावे त्यावर ३ फेब्रुवारी रोजी पासून ९ टक्के व्याज व तक्रारदारास नुकसान भरपाई ५० हजार व तक्रारीचा खर्च ५ हजार रूपये देण्याचे आदेशित केले. निकाल आयोगाचे अध्यक्ष राहूल पाटील, सदस्य विष्णू धबडे, नितीन अग्रवाल यांनी २२ जुलैला हा निकाल दिला आहे. तक्रारदारा तर्फे अॅड. माणिकराव निळकंठे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निळकंठे यांनी बाजू मांडली तर त्यांना अॅड. गजानन डाळ यांनी सहकार्य केले.