लातूर (Latur):- गोरगरीब जनतेला महागडी शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे, या उदात्त हेतूने राज्यभरात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. मात्र लाडक्या सरकारने ही योजना ऑगस्ट 2024 पासून सरकारी यंत्रणेमार्फत हाती घेतली आहे. परिणामी खाजगी एजन्सीने 30 जुलै 2024 पर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा डेटा सरकारी यंत्रणाकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या औषधांसाठी पैसे मोजावे लागत आहेत.
लाखो रुग्णांना विकत घ्याव्या लागतात औषध गोळ्या
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt)गेल्या काही वर्षापासून महात्मा फुले जन आरोग्य योजना काही निवडक रुग्णालयांमध्ये सुरू केली आहे. विविध आजारांच्या शस्त्रक्रियेपासून पुढे एक वर्ष प्रत्येक तीन महिन्याला औषध गोळ्या मोफत दिल्या जातात. मात्र लाडक्या सरकारने एक ऑगस्ट 2024 पासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेची खाजगी यंत्रणा बदलली आणि सरकारच्या अखत्यारीत केली. १ ऑगस्ट पासून आरोग्यमित्र कार्यालयातून औषध गोळ्या देणे सुरू ठेवले. परंतु 30 जुलै 2024 पर्यंत शस्त्रक्रिया झालेले रुग्ण एक महिन्यानंतर औषधी घेण्यासाठी आरोग्यमित्र कार्यालयात गेल्यानंतर योजना बंद झाली आहे, तुम्हाला यापुढची औषधी विकत घ्यावी लागेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक इकडे तिकडे चौकशी करून शेवटी सदर रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी रोख पैसे देऊन खरेदी करीत आहेत. अनेकांकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे औषधी खरेदी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. बरेच रुग्ण पैसे नसल्यामुळे औषध गोळ्याअभावी परत जाताना दिसत आहेत.
“जीवनदायी”चे कार्यालय सापडेना
दरम्यान, लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 30 जुलै 2024 पर्यंत उपचार घेतलेले रुग्ण (patient) किती, याची माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. गोरे यांना भ्रमणध्वनीवरून विचारली असता त्यांनी, आरोग्य मित्र तुम्हाला फोन करून सांगतील, असे बोलून माहिती देण्यास टाळाटाळ केली. विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्र कार्यालयात जिल्हा समन्वयक यांचे कार्यालय कुठे आहे असे विचारले असता त्यांनी अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयाच्या कॉम्प्लेक्समध्ये असल्याचे सांगितले. तेथे जाऊन चौकशी केली असता सदर योजनेचे कार्यालय कोणालाही माहित नाही आणि बोर्ड दिसत नाही.
एजन्सी बदलली आणि रुग्णांचा डेटा गायब
दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. गोरे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीवरून दुसऱ्यांदा संपर्क साधला असता, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 30 जुलै 2024 पर्यंत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा डाटा खाजगी एजन्सीने सरकारी यंत्रणेकडे दिलेला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना औषधी देता येत नाही. १ ऑगस्ट 2024 पासून शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनाच मोफत औषधी दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.