स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई २ लाख १६ हजाराचा मुद्देमाल ताब्यात
परभणी (Local crime branch) : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास नवा मोंढा परिसरात कारवाई करत काळ्या बाजारात जाणारे ११५ पोते धान्य जप्त केले. या कारवाईत ९१ हजार रुपयांच्या धान्यासह २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी संशयीत आणि धान्य कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि. अशोक घोरबांड, सपोनि. राजु मुत्तेपोड, पोलिस अंमलदार रवि जाधव, मो. इमरान, शेख, निलेश परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना त्यांना नवा मोंढा येथील आर.आर. ट्रेडर्स समोर दोन पॅजो अॅटो मध्ये रेशनचा माल भरल्या जात असल्याची माहिती मिळाली.
यावरुन पोलिसांनी कारवाई करत ८८ हजार रुपये किंमतीचा ४४ क्विंटल तांदुळ, ३ हजार रुपये किंमतीचा दोन क्विंटल गहु मिळून ११५ पोते धान्य जप्त केले. तसेच दोन वाहने ताब्यात घेतली. या ठिकाणी पोलिसांना शेख मुस्तखीम शेख मोहमद, शेख समद शेख अहेमद, सुनिल श्रीकिशन मोदानी हे इसम मिळून आले. पुढील कारवाईसाठी मुद्देमाल कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.