कारंजा-मानोरा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडे!
मानोरा (Local Government Elections) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघात अंतर्गत भेद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजप, शिंदे शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडी घटक पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, व उबाठा शिवसेना गटाचे इच्छुक उमेदवार स्वतंत्रपणे मतदारसंघात मतदार राजाची भेट घेऊन निवडणुकीत विजयी करण्यासाठी ग्रामीण भागात दारोदार भटकंती करीत असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडे गेल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळत आहे.
कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी निवडणुकीत उतरण्यासाठी आतापासूनच ग्रामीण भागातील गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार निवडणुकीत आमने-सामने येणार असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडी, एम आय एम पक्षासह बंडखोर व अपक्ष उमेदवार सुध्दा निवडणुक रिंगणात उतरणार असल्याने निवडणुका चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकाराच्या मते या घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी बाजी कोण मारेल, याचे गणित आतापासूनच कार्यकर्ते मांडत आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सोबत असलेले खा. सुप्रियाताई सुळे यांचे निकटवर्तीय युवा नेते ॲड ज्ञायक पाटणी जिल्हयासह कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष वेधून असुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी खास नजर ठेवून विधानसभा निवडणूक झाल्यापासून मतदार संघात विविध कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी कार्य करीत आहेत.




