परभणी/ मानवत (Lohara Sarpanch) : तालुक्यातील लोहरा येथील (Lohara Sarpanch) सरपंच जगन्नाथ दत्तराव रोडगे आणि सदस्य वेणूबाई नारायण जाधव यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले. अपर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी नुकताच आदेश देत जगन्नाथ रोडगे यांचे सरपंच पद रद्द केले आहे. अपिलार्थी अँड.रमेश शिवाजी जाधव यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले असून या ठिकाणी नव्याने सरपंच पदाची निवड करण्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाकडे सादर केले आहे.
अपर विभागीय आयुक्तांचा आदेश
मानवत तालुक्यातील लोहरा (Lohara Sarpanch) येथील कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून जगन्नाथ दत्तराव रोडगे यांनी घराचे पक्के बांधकाम केले होते. वारंवार परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती पुरवूनही कोणतीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे अँड. रमेश जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यायालय १६ मार्च २०२१ रोजी रीतसर तक्रार केली. सरपंचाने आपल्या पदाचा गैरवापर करत तीन ते चार मीटर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याचे अर्जदाराने उघडकीस आणूनही २०२२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदाराचा विनंतीअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे अर्जदार अँड. रमेश जाधव यांनी थेट अपर विभागीय आयुक्तांकडे याविषयी दाद मागण्याचा निर्णय घेतला.
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ च्या कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणात दिलेला अहवाल देखील ग्राह्य न धरता अर्ज फेटाळला गेला.
जिल्हाधिकाऱ्यांचा तो निर्णय नैसर्गिक न्यायतत्व आणि याविषयक कायद्यांना अनुसरून नसल्याने पुढे दाद मागण्यात आली.दरम्यान, अपर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. यावेळी (Lohara Sarpanch) सरपंच जगन्नाथ रोडगे यांनी संपादित जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज) (३) नुसार जगन्नाथ रोडगे हे सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरतात. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयात फेरबदल करणे गरजेचे असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.
जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालाला समोर ठेवत हा निर्णय घेण्यात आला. शासकीय जागेवर अतिक्रमणामुळे (Lohara Sarpanch) सरपंच जगन्नाथ दत्तराव रोडगे आणि सदस्य वेणूबाई नारायण जाधव यांचे पद रद्द झाले असून संबंधित विभागाने अतिक्रमण काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.अँड.रमेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नवीन सरपंच निवडीची प्रक्रिया याठिकाणी घेण्याचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.